पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई: आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी टोळीचा सूत्रधार बँकॉकहून गजाआड

पिंपरी-चिंचवड सायबर गुन्हा टोळी पर्दाफाश
पिंपरी-चिंचवड सायबर गुन्हा टोळी पर्दाफाश

पुणे(प्रतिनिधी)–दुबई आणि बँकॉक येथे बसून भारतातील हजारो नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी सिंडिकेटचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार सौरभ उर्फ गणेश बाळासो काळे याला थायलंडमधील बँकॉक विमानतळावर अटक करण्यात आली असून, ११ जून २०२६ रोजी मुंबई विमानतळावर त्याला अधिकृतपणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

चीनशी हातमिळवणी अन् कोट्यवधींची लूट

पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. गणेश काळे हा थेट चीनमधील सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात होता. ‘टास्क फ्रॉड’, ‘शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट फ्रॉड’ आणि ‘डिजिटल अरेस्ट’ यांसारख्या आधुनिक क्लृप्त्या वापरून तो भारतीय नागरिकांची लूट करत असे. यासाठी तो भारतातील काही लोकांकडून बँक खाती मिळवून गुन्ह्यातील पैसा गोळा करण्यासाठी त्यांचा वापर करायचा आणि हा सर्व काळा पैसा दुबईत बसून हाताळत असे.

अधिक वाचा  पुणे: टीसीएस कर्मचाऱ्याची आत्महत्या, दोन महिला कर्मचाऱ्यांसह एकावर गुन्हा दाखल

अनेक गुन्ह्यांचा मास्टरमाइंड

काळेविरुद्ध पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली २ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक, हिंजवडी पोलीस ठाण्यात शेअर मार्केटमध्ये १८ लाख रुपयांची फसवणूक, देहूरोड पोलीस ठाण्यात ऑनलाईन टास्क फसवणूक अशी गंभीर गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणाचा तपास जून २०२४ मध्ये वेगाने सुरू झाला, जेव्हा देहूरोड पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत गणेश काळे हाच खरा सूत्रधार असल्याचे समोर आले. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत कायदेशीर प्रक्रिया सुरू होताच, कारवाई टाळण्यासाठी काळे सप्टेंबर २०२५ मध्ये दुबई सोडून बँकॉकला पळाला होता.मात्र, पोलिसांनी हार न मानता महाराष्ट्र शासन आणि केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठपुरावा करून त्याच्याविरुद्ध ‘रेड कॉर्नर नोटीस’ आणि ‘एलओसी’  जारी करून घेतली.

अधिक वाचा  व्हिजहॅक टेक्नॉलॉजीज जगभरात उपलब्ध नोक-यांसाठी प्रशिक्षित सायबर सुरक्षा व्यावसायिकांची भरती पुण्यातून करणार

गणेश काळे बँकॉकहून दुसऱ्या देशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना, रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे तेथील सुरक्षा यंत्रणांनी त्याला विमानतळावरच ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रवीण स्वामी आणि त्यांच्या पथकाने त्याला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले.

ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सपोनि प्रवीण स्वामी, पोउपनि सागर पोमण आणि त्यांच्या पथकातील दीपक भोसले, हेमंत खरात, नितेश बिचेवार व अतुल लोखंडे यांनी केली आहे. [४] या अटकेमुळे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीच्या एका मोठ्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love