नवी दिल्ली : प्रशांत महासागरामध्ये ‘एल निनो’ नैसर्गिक स्थिती अधिकृतपणे सक्रिय झाली असून, तो १९५० नंतरचा सर्वाधिक तीव्र एल निनो असण्याची भीती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अमेरिकी हवामान संस्था ‘नोवा’ (NOAA) आणि क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (CPC) या संदर्भात अधिकृत घोषणा केली असून, याचे दूरगामी परिणाम भारतीय मान्सून आणि एकूणच जागतिक हवामानावर होणार आहेत. यावर्षीचा एल निनो इतका शक्तिशाली असेल की डिसेंबरमध्ये तो ‘सुपर एल निनो’चे स्वरूप धारण करू शकतो, असा अंदाज ६३ टक्के व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान अभ्यासकांच्या मते, प्रशांत महासागराचे तापमान सरासरीपेक्षा २ ते २.५ अंशांपर्यंत जास्त राहण्याची शक्यता असून, काही मॉडेल्समध्ये हे तापमान ३ अंशांच्या वर जाण्याचे संकेत मिळत आहेत. या बदलामुळे केवळ यंदाच्या पावसाळ्यावरच नाही, तर आगामी काळावरही मोठा परिणाम होईल. फेब्रुवारी २०२७ पर्यंत एल निनो सक्रिय राहण्याची शक्यता ९० टक्के असून, यामुळे २०२७ चा उन्हाळा अत्यंत तीव्र आणि तापदायक असेल, असा इशारा देण्यात आला आहे. एल निनोच्या या प्रभावामुळे भारतात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी किंवा अत्यंत अनियमित राहण्याचा धोका आहे, ज्याचा थेट फटका शेतीला आणि खरीप हंगामाला बसू शकतो.
भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा सरासरीच्या ९० टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामध्ये ५ टक्के कमी-अधिक तफावत असू शकते. हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी स्पष्ट केले की, एल निनोमुळे पावसाच्या प्रादेशिक वितरणात मोठी विषमता निर्माण होते. ज्या भागात नैसर्गिकरित्या कमी पाऊस पडतो, तिथे पावसाचे प्रमाण अधिक घटल्यास दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या मान्सूनची वाटचाल मंदावण्यामागे एल निनोची अप्रत्यक्ष भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. ढगांचे क्षेत्र असलेला ‘मॅडन ज्युलियन ऑसिलेशन’ (MJO) हा घटक हिंदी महासागराऐवजी प्रशांत महासागरातच सक्रिय राहिल्याने मान्सूनची प्रगती रोखली गेली आहे. तसेच आखाती देशांकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांनीही पावसाला रोखून धरले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने १२ जून २०२६ रोजी जारी केलेल्या ताज्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सूनने आता बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग, ओडिशा, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालचा काही भाग व्यापला आहे. सध्या मान्सूनची उत्तर सीमा सोलापूर, हैदराबाद, भद्राद्री कोठागुडेम आणि परदीप या भागांतून जात आहे. महाराष्ट्रासाठी दिलासादायक बाब म्हणजे, पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून राज्याच्या उर्वरित भागात आणि मध्य अरबी समुद्रात पुढे सरकण्यासाठी हवामान अनुकूल बनले आहे. एल निनोचे संकट उभे असले तरी, मान्सूनच्या प्रगतीकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
















