पुणे– पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भारतीय औषध नियंत्रक विभागाने (DCGI) मंगळवारी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या ‘कोव्हीशिल्ड’ या लशीची थांबवण्यात आलेली चाचणी पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर डीसीजीआयने दुसऱ्या आणि तिसर्या टप्प्यातील चाचण्यांना नवीन उमेदवारांची निवड करण्यास मनाई केलेला पूर्वीचा आदेश देखील फेटाळला आहे. त्यामुळे सिरम भारतात करत असलेल्या ‘कोव्हीशिल्ड’ या लसीच्या चाचण्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
दुष्परिणामांच्या संशयामुळे ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी जगभरात थांबवण्यात आली होते. अॅस्ट्राझेन्का कंपनीने याची घोषणा केल्यानंतर सिरम इन्स्टिटय़ूटकडून भारतात सुरु असलेल्या ‘कोव्हीशिल्ड’ या लसीच्या मानवी चाचण्यांना भारतीय औषध नियंत्रक विभागाकडून (DCGI) स्थगिती देण्यात आली होती.
त्यानंतर सिरम इन्स्टि्यूटला वैद्यकीय चाचणीसाठी भरती थांबवण्याचा आदेशही भारतीय औषध नियंत्रक विभागाकडून (DCGI) देण्यात आला होता. करोना लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी पुढील आदेश येईपर्यंत नव्या स्वयंसेवकांना घेतलं जाऊ नये असं डीसीजीआयने आदेशात म्हटलं होतं.
भारतातील १७ ठिकाणी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. दुसऱ्या व तिसर्या टप्प्यातील यशस्वी चाचणीनंतर लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जगभरात लसीच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी मागणी केली जात आहे.