पुणे(प्रतिनिधि)—आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, अशी थेट साद जेष्ठ नेते शरद पवार यांना घालत विधानसभेसाठी बारामतीमधून अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काका विरुद्ध पुतण्या अर्थात युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा सामना होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.
शरद पवार मंगळवारपासून तीन दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. ते मतदारसंघातील दुष्काळी भागाचा दौरा करतील. त्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. त्यांना भेटण्यासाठी सकाळपासूनच गोविंद बागेत नागरिकांनी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत शरद पवार यांची भेट घेत याबाबत मागणी केली आहे. शरद पवार आणि युगेंद्र पवार हे आज एकत्र बारामतीच्या पक्ष कार्यालयात उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी याबाबतची मागणी केली. कार्यकर्त्यांच्या याबाबतच्या संभाषणाचा व्हिडीओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
युगेंद्रदादांपेक्षा कुणीच चांगला उमेदवार नाही. युगेंद्रदादांना उमेदवारी मिळावी ही आमची इच्छा आहे. तुम्ही फक्त युगेंद्रदादांना ताकद द्या. आम्ही सगळे त्यांच्या पाठिशी आहोत. आमचं दादांवर लक्ष आहे. आता फक्त तुमचं दादांवर लक्ष ठेवा. कारण आम्हाला आता दादा बदलायचा आहे. आम्हाला शांत दादा आणायचा आहे अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. त्यावर शरद पवार यांनी आम्ही चर्चा करु, असे उत्तर कार्यकर्त्यांना दिले.
दादा शब्द फिरवणार नाहीत
बारामतीत मध्ये विधानसभेला पवार विरुध्द पवार असा सामना होणार नाही कारण जर लोकसभेला सुनेत्रा पवार पडल्या तर मी विधानसभा लढणार नाही, असा शब्द अजित पवार यांनी दिल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला. आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे. युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाल्यानंतर अजित पवार गट बॅकफूटवर आहे. त्यामुळे बारामतीमध्ये आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा अजित पवारांविरोधात आवाज उठण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे यांच्यासाठी युगेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार यांनी काका अजित पवारांविरोधात शड्डू ठोकला आहे.
बारामतीमध्ये उमेदवार कोण असणार याचा अंतिम निर्णय हा शरद पवार यांचाच असणार आहे. मात्र, युगेंद्र पवार यांच्या समर्थकांकडून आतापासूनच रान उठवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या विधानसभेला बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार आणि काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
कोण आहेत युगेंद्र पवार?
अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र पवार चिरंजीव आहेत. युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार आहेत. शरयु ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार व्यवसायामध्ये सक्रिय आहेत. फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखाना युगेंद्र पवार पाहतात. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे युगेंद्र पवार अध्यक्ष आहेत, सध्या त्यांना त्या पदावरून काढल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर युगेंद्र पवार शरद पवार यांच्यासोबत उभे राहिले होते.
बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय अशी लढत उभ्या महाराष्ट्राने पाहिली. याच निवडणुकीत संपूर्ण पवार कुटुंब एका बाजूला आणि अजित पवारांचे कुटुंब एका बाजूला अशी परिस्थिती होती. युगेंद्र पवारांनी काकांची साथ सोडून शरद पवारांची साथ धरली आणि बारामतीत आत्याचा प्रचार केला आणि आत्याला निवडून देखील आणले. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांना अजित पवारांनी उमेदवारी दिली आणि त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ अजित पवारांच्या विरोधात शर्मिला पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवारांनी प्रचार केला.