युवा कलाकारांनी गाजवला तालचक्र महोत्सवाचा दुसरा दिवस-बहारदार सांगीतिक मैफलीनी पुणेकर मंत्रमुग्ध


पुणे : तबला, जेंबे, व्होकल पर्कशन, सितार, ड्रम, सारंगी, गिटार अशा विविध तालवाद्यांच्या सोबत गायनाच्या सुरेल मैफिलीची उधळण करत युवा कलाकारांनी तालवाद्यांचा भारतातील एकमेव महोत्सव असलेल्या ‘तालचक्र’ महोत्सवाचा दुसरा दिवस गाजवला.

पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत आणि बढेकर ग्रुप यांच्या सहकार्याने व पद्मश्री पं. विजय घाटे निर्मित तालचक्र महोत्सवाच्या ९व्या पर्वाच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात पं. नयन घोष यांचे चिरंजीव ईशान घोष, उ. तौफिक कुरेशी यांचे सुपुत्र शिखरनाद कुरेशी व योगेश शम्सी यांचे सुपुत्र श्रवण शम्सी या त्रयींचा तालवाद्य सहवादनाचा बहारदार कार्यक्रमाच्या सादरीकरणाने झाली.  यामध्ये सुरुवातीला ईशान घोष (तबला), शिखरनाद कुरेशी (जेंबे), श्रवण शम्सी (ड्रम) या तिघांनी सात मात्रांचा छंद ध्रुपद मध्ये सादर करत उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर मेहताब अली नियाझी यांच्या सितार वादनाने मैफिलीत रंगत आणली. ईशान घोष यांचा तबला आणि प्रेक्षकांच्या टाळ्या अशी जुगलबंदीही यावेळी रंगली. पुणेकरांसाठी गणेशोत्सव आणि ढोलताशा हे आगळे वेगळे समीकरण बनले आहे. याच ढोलताशाची झलक जेंबे मधून सादर करीत शिखरनाद कुरेशी यांनी पुणेकरांची उत्स्फूर्त दाद मिळवली. मैफलीच्या समारोपाच्या पहिल्या टप्प्यात तबला, जेंबे, ड्रम आणि सितारची अनोखी जुगलबंदी रंगली. याला पुणेकरांनी स्टँडींग ओवेशनने दाद दिली. ऑर्लीकॉर्नचे प्रवीण शिरसे आणि पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला.

अधिक वाचा  माऊलींच्या पालखी सोहळ्याने विठुनामाच्या बळावर दिवे घाटाची अवघड व नागमोडी वळणे लीलया केली पार

तालचक्र महोत्सवाच्या शेवटच्या सत्रामध्ये गायिका विदुषी कौशिकी चक्रवर्ती, जीनो बॅंक्स, शेल्डन डिसिल्वा, ओजस अढिया, सारंगीवादक मुराद अली व अतुल रनिंगा यांनी एकत्रित सादर केलेल्या “फ्युजन २०२१” या अनोख्या संगीत अविष्काराने पुणेकर भारावून गेले. या फ्युजन मैफलीची सुरूवात कौशिकी चक्रवर्ती यांनी ‘जा जा रे अपनी मंजील पा ..’ या गीताने केली. त्यानंतर राग यमन कल्याणमध्ये ‘तिल्लाना..’ सादर करीत रसिकांची मने जिंकली. यानंतर मिश्र पहाडी रागातील ‘सजनवा कब आओगे ..’ आणि ‘रंगी साजना..’ या रचना सादर करीत मैफिलीत रंग भरले. यानंतर अतुल रनिंगा यांच्या रचनेवर सारंगी, तबला, ड्रम, बेस गिटार यांचे बहारदार एकल वादन झाले. शंतनू मोईत्रा आणि स्वानंद किरकिरे यांच्या ‘लागे ना मोरा जिया’ आणि ‘लागी लागी’ या दोन सुरेल रचना सादर करत कौशिकी चक्रवर्ती यांनी तालचक्र महोत्सवाचा समारोप केला.

अधिक वाचा  पुण्यातील  वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावर भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांचा दावा : महायुतीत महानाट्य रंगण्याची शक्यता

कौशिकी चक्रवर्ती यांना रश्मी मोघे, मालविका दीक्षित आणि संघमित्रा यांची स्वरसाद लाभली. लोकमान्य मल्टीस्टेट कॉ ऑपरेटीव्ह सोसायटीचे सुशील जाधव व पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या हस्ते कलाकारांना सन्मानित करण्यात आले. तालचक्र महोत्सवाच्या सर्व सत्रांचे निवेदन मिलींद कुलकर्णी यांनी केले. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत आणि बढेकर ग्रुप यांच्या सहकार्याने सादर झालेल्या  ‘तालचक्र’ महोत्सवाचे लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी,  पी.एन.जी. अँड सन्स, कोहिनूर ग्रुप सहप्रायोजक होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love