लोकसंगीत आणि तबला -खंजिरी – कथ्थक च्या जुगलबंदी ने गाजवला ‘तालचक्र’ महोत्सवाचा पहिला दिवस

कला-संस्कृती पुणे-मुंबई
Spread the love

पुणे : मागील दोन वर्षांच्या कोरोना कालखंडानंतर भारतातील एकमेव तालवाद्य महोत्सव असलेल्या तालचक्र महोत्सवाची सुरूवात ढोलकी, चोंडक, दिमडी, संबळ अशा लोककलेतील तालवाद्या बरोबरच तबला आणि कथ्थकच्या जुगलबंदीने आणि खंजिरीच्या अनोख्या सादरीकरणाने झाली. कोरोनोत्तरच्या काळाची सुखद सांस्कृतिक सुरूवात करणारी एक संस्मरणीय संध्याकाळ पुणेकरांनी अनुभवली.

पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत आणि बढेकर ग्रुप यांच्या सहकार्याने व पद्मश्री पं. विजय घाटे निर्मित ‘तालचक्र’ या भारतातील एकमेव तालवाद्य महोत्सवाच्या ९व्या पर्वाचे उद्घाटन आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे विद्वान सेल्वा गणेश, पद्मश्री पं. विजय घाटे, पं. अतुलकुमार उपाध्ये, बढेकर ग्रुपचे प्रवीण बढेकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आले.

तालचक्र महोत्सवाच्या पहिल्या सत्राची सुरूवात प्रसिद्ध ढोलकी वादक निलेश परब आणि कृष्णा मुसळे यांच्या “महाराष्ट्र Folk” या कार्यक्रमाने झाली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला ढोलकी आणि कड यांचा संयुक्त वापर असलेल्या गणाने करण्यात आली. त्यानंतर चोंडक या वाद्याचा  वापर करत शशांक हडकर यांनी ‘लल्लाटी भंडार ..’ या  गाण्यातून  भक्तिमय वातावरण निर्मिती केली. नीलेश परब यांनी तब्बल दोन वर्षांच्या कालावधी नंतर संबळ रसिकांसमोर सादर करताना “तुळजा भवानी आई..’ आणि ‘लख्ख पडला प्रकाश..’ या दोन गाण्यांच्या सादरीकरणातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर ढोलकी, दीमडी, टाळ यांच्या तालात सादर झालेल्या ‘यळकोट यळकोट जय मल्हार …’, ‘रूसला का मज वरी ..’ ही गाणी जितेंद्र तूपे यांनी आपल्या दमदार आवाजात सादर करीत उपस्थितांच्या काळजाला हात घालत वन्स मोअर मिळविला. नीलेश परब यांनी सादर केलेला धनगरी ढोल, कृष्णा मुसळे यांची सोलो ढोलकी आणि तबल्याच्या बाजाने केलेल्या ढोलकी वादनाच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. नीलेश परब व कृष्णा मुसळे यांना जितेंद्र तूपे (गायन), शशांक हडकर (तालवाद्य), दत्ता तावडे (ऑक्टोपॅड), सत्यजीत प्रभू (कीबोर्ड) यांची संथसंगत लाभली.

तालचक्र महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात ‘मेलोडिक रिदम’या कार्यक्रमाने रसिकांना भारावून टाकले. या कार्यक्रमाची सुरुवात पं. विजय घाटे यांनी ज्येष्ठ गायक पं. राजन मिश्रा यांना श्रद्धांजली वाहून केली. यानंतर नृत्यांगना शीतल कोलवलकर यांच्या कथ्थक व पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या तबला वादनाने एका अनोख्या पद्धतीने शिववंदना सादर करण्यात आली. त्यानंतर भजन, पारंपरिक कथ्थक, विद्वान सेल्वा गणेश यांनी दाक्षिणात्य खंजिरी वादनातून पुणेकरांना मंत्रमुग्ध केले. पद्मश्री पं. विजय घाटे यांनी तबल्यावर पेशकार, कायदा, गत, परण यातून रसिकांपुढे अनोखी सांगीतिक पर्वणी सादर केली, तर कथ्थकमध्ये थाट अमध, चक्रातार असा पदन्यास रसिकांनी अनुभवला. कार्यक्रमात तबला, कथ्थक आणि खंजिरीच्या जुगलबंदी ने रंगत आणली. त्यांना मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), सुरंजन खंडाळकर (गायन) यांची साथ संगत लाभली. कलावंतांचा सन्मान पी. एन. जी. अँड सन्सचे अजित गाडगीळ आणि युवा उद्योजक पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत आणि बढेकर ग्रुप यांच्या सहकार्याने सादर होत असलेल्या या ‘तालचक्र’ महोत्सवाचे लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी आणि पी.एन.जी. अँड सन्स हे सहप्रायोजक आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *