कुटुंबात सामाजिक मूल्ये रुजली असली आणि संवेदनशीलता असेल तर संपूर्ण कुटुंबच समाजासाठी आयुष्य देते. दीनदयाल शोध संस्थानात पूर्ण वेळ काम केलेल्या मृदुलाताई अनेक अडचणी आल्या तरीही १९७८ पासून अविरत सामाजिक काम करणाऱ्या समाजशिल्पी आहेत. ‘लग्न केलंच तर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि हुंडा न घेणाऱ्या मुलाशीच करायचं,’ असा पण केलेल्या मृदुलाताईंना जोडीदार पण तसाच मिळाला. अत्यंत आनंदाने आणि समाधानाने अजूनही काम करत असलेल्या मृदुलाताईंना समाजाला आपला उपयोग झाला याचा अभिमान आहे.
त्या म्हणतात, “वडील संघ स्वयंसेवक असल्याने प्रचारक आणि कार्यकर्त्यांचे घरी येणे जाणे असे. संघ कार्यकर्ते विश्वनाथ लिमये नेहमी येत असत. ते विचारत असत शिक्षणानंतर काय? मीही विचार केला की केव्हातरी लग्न होणारच आहे आणि नाही झालं तरी ते आयुष्याचं ध्येय नाही. लग्न नाही झालं तर राष्ट्रसेविका समितीचे काम आयुष्यभर करू. मात्र मा. नानाजी देशमुख यांच्या बरोबर काम करणारे कार्यकर्ते गणेश पाठक यांच्याशी नानाजींच्या आशीर्वादाने लग्न झालं. नानाजींनी तेव्हाच सांगितल होतं की तुला लग्नानंतर गोंदियाला शाळा सुरू करायची आहे” .
सुरूवातीच्या कामाबद्दल त्या सांगतात, “परिवाराने प्रचारक म्हणून काम करावं, ही नानाजींची कल्पना होती. दिनदयाळ संस्थेमध्ये ‘समाजशिल्पी’ ही संकल्पना राबवली जायची. नानाजींनी राजकारणातून संन्यास घेऊन, मे 78 मध्ये कामाची सुरुवात केली होती. पहिल्या दिवसापासून माझे पती नानाजींसोबत काम करत होते. मी लग्नानंतर गोंदियातून गोंडा प्रकल्पात काम करायला गेले. आजूबाजूच्या १५ गावांतून फिरून काम सुरु केले, 36 मुलांपासून शाळा सुरू केली. त्या भागातील लोकांना शिक्षण नवीनच होते. अशा लोकांसाठी हे काम होते. नानाजींच्या कल्पनेतील पहिले शिशुमंदिर गोरखपुरला साकार झाले.
“गोंडा प्रकल्पाच्या शैक्षणिक कामासाठी मला B. Ed. करावं लागलं आणि अयोध्या युनिवर्सिटीतून MA एज्युकेशन केलं. त्या काळात ग्रामीण भागात वीज कनेक्शन असून लाईट नसायचे. त्यामुळे अभ्यासासाठी रात्री कंदील किंवा लॅम्प वापरावा लागे. तिकडे महिलांना अगदी महिलांसमोरसुद्धा घुंघट घेऊनच बोलावे लागायचे. सतत संवाद साधून हे कमी झाले. भजनाचा ग्रुप करून त्यांना एकत्र आणायला सुरुवात केली. मी मुख्याध्यापिका असताना शाळेत मुली यायला लागल्या, तेंव्हा त्यांची फी भरायला वडिलांऐवजी आईनेच यावे असा आग्रह केल्याने त्या महिला शाळेत यायला लागल्या. त्यातून त्यांचे दर महिन्याला एकत्रीकरण, खेळ, प्रार्थना असे उपक्रम सुरू झाले. या केंद्रात मा. रज्जु भैय्या, उषा काकू, प्रमिलाताई आणि अनेक मान्यवर भेट द्यायला यायचे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हीही घडत होतो. त्यांना भारतरत्न मिळालं त्या कार्यक्रमाला आम्ही दिल्लीला गेलो, त्यावेळी नानाजी किती मोठे व्यक्तिमत्व होते ते जाणवलं. अभिमान वाटला अशा व्यक्तीचा सहवास आणि मार्गदर्शन आपल्याला जीवनातली नऊ वर्षे लाभले आहे. त्यानंतर बीडमध्ये साखर कारखान्यातल्या कामगारांच्या मुलांसाठी काम सुरू करायचे होते. ते काम आम्ही बघावं असे ठरलं.”
आता पूर्ण वेळ काम थांबवावे, असा विचार केलेल्या मृदुलाताईंचे काम पुन्हा सुरू झाले. त्या सांगतात, “२०१३ साली आम्ही या कामातून थांबायचे ठरवले. पुढे काय करावं हे ठरवलं नव्हतं. वर्ध्याला गेलो. तिथे खेळघर सुरू केलं. आम्ही एक गाव पण दत्तक घेतलं होतं पण कौटुंबिक कारणाने २०१८ ला पुण्याला शिफ्ट व्हावं लागलं. लॉक डाऊनच्या काळात संस्कृत भारतीचा कोविद कोर्स केला. अहमदाबादच्या एका विद्यापीठासाठी पुस्तक लिहिण्याचा योग आला. नंतर एकनाथजी रानडे यांच्यावरील मराठी पुस्तकाचा हिन्दी अनुवाद केला.”
“सध्या राष्ट्र सेविका समितीने पश्चिम महाराष्ट्राचे सेवा विभागाचे दयितत्व दिले आहे. तळेगावला ताई आपटे यांच्या नावाने मोठी वास्तू बांधली आहे. तिथले प्रकल्प सुरू आहेत. त्याचे उद्घाटन नानाजी यांनीच केलेले आहे. अनेक अडचणींना तोंड देत काम करावं लागतं,. पण त्या सोडवतच आपण पुढे जात असतो.”
डॉ. नयना कासखेडीकर