12th state result 93.37 percent

बारावीचा राज्याचा निकाल ९३.३७ टक्के : यंदाही मुलींचीच बाजी : पुणे विभागाचा निकाल ९४.४४ टक्के

महाराष्ट्र शिक्षण
Spread the love

पुणे(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज (मंगळवारी) जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल ९३.३७ टक्के इतका असून गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात २. १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला होता. दरम्यान,यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८४ % ने जास्त आहे. दरम्यान, नऊ विभागामध्ये कोकण विभाग निकालामध्ये अव्वल ठरला असून कोकण विभागाचा निकाल (९७.५१ %) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (९१.९५ %) लागला आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर या वेळी उपस्थित होते. यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च दरम्यान घेण्यात आली. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,३३,३७१ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,२३,९७० विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,२९,६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व निकालाची टक्केवारी ९३.३७ आहे.

गोसावी म्हणाले, की बारावीची सहा माध्यमांतील १५४ विषयांची परीक्षा घेण्यात आली. अंतर्गत परीक्षेचे गुण ऑनलाइन घेतल्यामुळे निकाल लवकर जाहीर होण्यास मदत झाली. गैरप्रकारांची संख्या घटली. राज्यस्तरावर २७१ भरारी पथके नेमण्यात आली होती, तसेच जिल्हा स्तरावरही स्वतंत्र भरारी पथके नियुक्त करण्यात आली होती.

यंदाही मुलींचीच बाजी

यंदाही बारावीच्या निकालामध्ये मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे. यावर्षी ९५.४४टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण ९१.६० टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा ३.८४ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 

विभागनिहाय निकाल (टक्केवारी मध्ये)

कोकण :           ९७.५१

पुणे : ९४.४४

कोल्हापूर :         ९४.२४

अमरावती :         ९३.००  

छत्रपती संभाजीनगर : ९४.०८

नाशिक :            ९४.७१

लातूर :             ९२.३६

नागपूर :            ९३.१२

मुंबई :              ९१.९५

गुणपडताळणीसाठी कशी आणि कधीपर्यंत कराल?

ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत आक्षेप असेल अशा विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी, गुणांच्या पडताळणीसाठी अर्ज करावा लागेल. यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरुन (http://verification.mh- hsc.ac.in) विद्यार्थ्यांना स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फे अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी/शर्ती आणि सूचना वेबसाईटवर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी २२ मे ते ५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या काळात विद्यार्थी ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. शिवाय यासाठी आवश्यक शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking) भरता येईल. गुणपडताळणीसाठी प्रती विषय ५० रुपये इतकं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं मंडळाकडे जमा करावं लागेल.

उत्तर पत्रिकांच्या छायाप्रती

फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे/संकेतस्थळावरुन, हस्तपोहोच अथवा रजिस्टर पोस्टाने यापैकी एका पर्यावाची निवड करता येईल. त्यांनी मागणी केलेल्या पध्द‌तीने छायाप्रती उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, यासाठी विद्याथ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे बुधवार, २२ मे ते बुधवार, ५ जूनपर्यंत विहित नमुन्यात उपरोक्त संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करणं आवश्यक राहील. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी प्रति विषय ४०० रुपये इतकं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं मंडळाकडे जमा करावं लागेल.

उत्तरपत्रिकांचं पुनर्मूल्यांकन करण्यासाठी काय कराल?

उत्तरपत्रिकांचं पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात प्रति विषय ३०० रुपयांप्रमाणे शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरत संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक राहील

विविध स्पर्धा परीक्षा, प्रवेश पात्रता (उदा. जेईई नीट इत्यादी) परीक्षेसाठी प्रक्रिया होणाऱ्या विज्ञान शाखेच्या विद्याध्यांच्या उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत व पुनर्मूल्यांकन तातडीने आणि प्राधान्याने करून देण्याबाबत सर्व विभागीय मंडळाना सूचना देण्यात येत आहेत. त्यासाठी त्यांनी सदर परीक्षेच्या प्रवेशपत्राची प्रत विषय शिक्षकांच्या अभिप्रायासोबत अपलोड करावी.

ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणाऱ्या माहिती तंत्रज्ञान (IT) आणि सामान्य ज्ञान (G.K.) या विषयांच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करून देण्यात येणार आहे. त्यासाठी देखील उपरोक्त पद्धतीनं ऑनलाईन अर्ज करणे आणि ऑनलाईन शुल्क भरणे आवश्यक राहील.

पुनर्परिक्षार्थी निकालाची टक्केवारी ४९.८२

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४५,४४८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४५,०८३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी २२,४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ४९.८२ आहे.

खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ४१,३६२ एवढी असून त्यापैकी ४०,७९५ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून ३४,९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी ८५.७६ आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९४.२० टक्के

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७०३२ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६९८६ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६५८१ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ९४.२० आहे.  इ.१२ वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.

५४ पैकी २६ विषयांमध्ये १०० टक्के निकाल

यंदा १५४ पैकी २६ विषयांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. राज्यात विज्ञान शाखेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू अशा भाषांमध्ये परीक्षा पार पडल्या होत्या तर कला व वाणिज्य शाखेच्या परीक्षांमध्ये कन्नड व गुजरातीतुन परीक्षा देण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध होता.

छत्रपती संभाजीनगर विभागातील विद्यार्थिनीला १०० टक्के गुण

छत्रपती संभाजीनगर विभागातील विद्यार्थिनीला १०० टक्के गुण मिळाले आहेत. १०० टक्के गुण मिळवलेली ही राज्यातील एकमेव विद्यार्थिनी आहे. या विद्यार्थिनीला प्रत्यक्ष परीक्षेत ५८२ आणि क्रीडा गुण १८ असे एकूण ६०० पैकी ६०० गुण मिळाले आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

गोसावी म्हणाले, की वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनीने १०० टक्के गुण मिळवणे कौतुकास्पद आहे. खेळात केलेली मेहनत आणि अभ्यासातील सातत्य याचा परिणाम तिच्या निकालात दिसत आहे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *