अहिंसक स्वातंत्र्य आंदोलनासाठी झटणारे जतरा टाना भगत

महाराष्ट्र लेख
Spread the love

नाभ्यार्थितो जलधरो$पि जलं ददाति।

संतः स्वयं परहितेषु कृताभियोगाः।।

कोणी मागीतल्यावाचूनच मेघ जल-पाणी देतात, त्याचप्रमाणे संत  स्वतःच परहितामध्ये तत्पर असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जतरा टाना भगत, ज्यांनी अहिंसक आंदोलनाद्वारे  वनवासींच्या हितासाठी स्वातंत्र्य आंदोलनात इंग्रजांविरूध्द रान उठवलं.’

जतरा भगत यांचा जन्म उरॉव जनजातीमध्ये ३ सप्टेंबर १८८८ रोजी झारखंड मधील ,गुमला जिल्ह्यातील ,बिशनपूर ठाण्यातील ,चिंगरी नवाटोली गावात झाला.वडिलांचे नाव कोदल उरॉव आणि आईचे नाव लिबरी होते.लहानपणापासूनच जतरा भगत धार्मिक वृत्तीचे होते.पूजा-पाठ करणे, परमेश्र्वराची आराधना करणे हे त्यांचे नित्याचे काम होते.

किशोर अवस्थेत ते शालेय शिक्षणाऐवजी तंत्र-मंत्रातील विद्या शिकण्यासाठी हेसराम गावी जा-ये करत.एक दिवस एका झाडावरून एका पक्ष्याचे अंडे त्यांच्या हातून खाली पडून फुटले.त्यामध्ये असलेले पक्ष्याचे छोटे पिल्लू मरण पावले.ते पाहून त्यांना अतोनात दुःख झाले.आपल्या हातून एका जीवाची हत्या  झाली याचे त्यांना खूप वाईट वाटले.त्या दिवसापासून कोणत्याही जीवाची हत्या  न करण्याचा त्यांनी संकल्प केला.१९१४ च्या एप्रिल महिन्यात एकदा नदीवर स्नानाला गेले असता त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले.

ते लोकांना; मांस खाऊ नका,दारू पिऊ नका,पशूंचे बळी देऊ नका,जानवे धारण करा,गायींची सेवा करा,अंगणात तुळस लावा ,तिला रोज पाणी घाला असा उपदेश करीत.त्यांचे विचार आणि आचरण पाहून लोकांनी त्यांना संतपद बहाल केले.

लहान असल्यापासून ते इंग्रजांचे अत्याचार पाहात होते.इंग्रजांकडून होणार्‍या धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक शोषणांनी त्रस्त झालेल्या उरॉव जनजातीत इंग्रजांविरूध्द मोठा असंतोष पसरला होता.इंग्रजांच्या या कृत्यांमुळे हे लोक इंग्रजांविरूध्द उठाव करत होते पण संघटितपणे हे उठाव होत नसल्यामुळे ते निष्फळ ठरत होते.ही गोष्ट जतरा भगत यांच्या लक्षात आली.’ एकी हेच बळ ‘ हे त्यांना माहित होते.त्यांनी लोकांचे संघटन करण्याचे ठरविले.

   ‘ दर्‍याखोर्‍यातुनी सार्‍या, पुकारा घालूनी साद ।

स्वराज्याचा महामंत्र घुमुदे अंबरी नाद।।

हराया दैन्य देशाचे ,करूया प्रबळ संघटना।

नव्या मन्वंतराची ही असे संजीवनी जाणा।।

या कवितेनुसार त्यांनी गावोगावी जाऊन लोकांना साद घालून संघटना ऊभी केली आणि धार्मिक, सुधारणावादी आंदोलनाची सुरूवात केली.

ते म्हणत, ” धर्मेशने ( परमेश्र्वराने) मला सांगितले आहे की इंग्रज आणि जमीनदारांचे राज्य संपवून टाक.त्यांना खेचून आपल्या देशाच्या बाहेर ढकल.इंग्रज ,महाजन, जमीनदार ही सर्व भुतं आहेत.त्यांना खेचून देशाबाहेर काढ.”

सरकारी कचेर्‍यांवर मोर्चा नेताना ते आणि सर्व लोक पुढील गीत गात.

         टन – टन टाना

टाना बाबा टाना,भूत भुतनिके टाना।

     टाना बाबा टाना।

कोना – कुची भूत-भुतनिके टाना।

    टाना बाबा टाना

लुकल – धीपल भूत भुतनीके टाना।।

(हे पिता, हे माता ,देशाचा प्राण घेणार्‍या ,वनवासींना लुटणार्‍या ,वनवासींना मारणार्‍या या सर्व भुतांना खेचून देशाबाहेर हाकलण्यासाठी आम्हाला मदत करा.)

हे आंदोलन टाना भगताच्या नावाने प्रसिध्द आहे. या आंदोलनाची सुरूवात धोबी टोली गावापासून झाली.जतरा भगत म्हणत, ” आम्ही जमीनदारांकडे काम करणार नाही,आम्ही इंग्रज सरकारची कामं करणार नाही.आम्ही त्यांच्याकडे मोलमजुरी करणार नाही.हे लोक आम्हाला लुटत आहेत. आम्ही त्यांना कर देणार नाही.”

इंग्रज सरकारने जतरा भगतांसह ७ वनवासींना अटक केली. थोड्या दिवसानंतर त्यांना सोडून दिले.त्यानंतर हे आंदोलन चांगलेच तीव्र झाले. स्वतंत्रता आंदोलनात जतरा भगत आणि त्यांच्या अनुयायांचा फार मोठा सहभाग आहे.याच आंदोलनाच्या दरम्यान १९१५ मध्ये जतरा भगत हुतात्मा  झाले.

वनवासींमध्ये अशी भावना आहे की, महात्मा गांधींच्या असहकार चळवळीची प्रेरणा जतरा भगतांचे असहकार आंदोलन आहे. जतरा भगत यांच्या ३ सप्टेंबर या जन्मदिनी त्यांना जनजाती कल्याण आश्रमातर्फे विनम्र अभिवादन.

१)संदर्भ…वन बन्धु ( स्वतंत्रता प्राप्ति में जनजाति समाजका योगदान)

२) गुगल.

                शोभा जोशी

(जनजाती कल्याण आश्रम ,पुणे महानगरची कार्यकर्त्या )

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *