आणि चौदार तळे अखेर चवदार झाले,समरसतेचे साक्षीदार झाले

महाराष्ट्र लेख
Spread the love

जीवन संघर्ष कशाला म्हणतात? हे खरच खर्‍या अर्थाने बाबासाहेबांच्या जीवनाच्या अभ्यासातून समजते. . बाबासाहेब हे जीवंत आग होते. धगधगता ज्वालामुखी होते, त्यांनी जेथे जेथे पाय ठेवला तेथील मातीचासुद्धा कण न कण पेटून उठत होता तथे जीवंत माणसाची ती काय कथा.

म्हणून चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला दलित व एकूणच भारतीय सामाजिक चळवळीत सर्वात जास्त महत्त्व आहे. त्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला आज शहाण्णव वर्ष पूर्ण झाली, पण अजूनही तो दिवस “20 मार्च 1927” जिवंत वाटतो. अजून सुद्धा बाबासाहेबांचे शब्द कानात घुमतात. असे वाटते की हा असाच आत्ता जावे त्या जादूमय महाडच्या भूमीवर, आणि डोळे भरून अनुभवावे बाबासाहेबांचे अस्तित्व, महाडच्या त्या भारलेल्या हवेमध्ये त्यांनी घेतलेल्या त्या श्वासांचा सुगंध नक्कीच दरवळत असेल अजूनही. कदाचित मातीमध्ये अजून त्यांच्या पायांच्या खुणा दिसत असतील. अजून त्या चवदार तळ्याच्या पाण्याला बाबासाहेबांचा स्पर्श आठवत असेल. अजून आसमंतात घुमत असतील त्यांचे शब्द,

 ते तेथे नक्की भेटतील. मग होता येईल साक्षीदार त्या क्रांतीकारी जादूमय घटनेचे आणि  तो दिवस मनात ठेवाता येईल साठवून, अनंतकाळासाठी.  त्यावेळीही प्रत्येकाला मग ते स्पृश्य असोत वा अस्पृश्य आपण या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार असायला हव होतं!” असं वाटल्यावाचून राहिलं नसणार, याची खात्री वाटते. कारण मूळात हा लढा ना कोणत्या धर्माविरुध्द होता, ना कोणत्या जाती विरुध्द, खोल अभ्यास केला तर असे दिसून येईल की, हा संग्राम होता, संपूर्ण मानव जातीला विषमतेच्या जोखाडातून मुक्त करण्यासाठीचा. हा संग्राम होता समाजात  बंधुभाव म्हणजेच समरसता निर्माण करण्यासाठीचा. हा संग्राम होता गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव होऊन, त्याने पेटून उठावं, यासाठीचा. भारतीय सामाजिक मानसिकता परिपक्व आणि सबल करण्याच्या दिशेने पडलेले हे भारतीय इतिहासातले सर्वात प्रभावी असे पाऊल होते. दुसरी दखल घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा संग्राम स्पृश्य आणि अस्पृश्य दोघांनी एकत्रितपणे लढलेला होता. परिषदेत बोलणारे मुख्य वक्ते बापूसाहेब सहस्रबुद्धे  आणि अनंतराव चित्रे हे दोघे आणि संयोजक नानासाहेब टिपणीस तिघेही स्पृश्यच होते. त्यांच्याशिवाय हिंदू महासभेचे बापूराव जोशी, गांधीवादी तुळजारामभाई शेठ, गावातील प्रतिष्ठीत व्यापारी शंकरभाई धारीया अशी काही प्रमुख नावं जरी  लक्षात घेतली, तरी हा लढा कोणत्या एका जातीपुरता  मर्यादीत नव्हता हे समजायला आरसा लागणार नाही.

तिसरी गोष्ट म्हणजे या संग्रामात असे अनेक अज्ञात स्पृश्य अस्पृश्य समाजसुधारक होते, ज्यांनी आपले तन मन धन पणाला लाऊन लढा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला.  अशा ज्या या क्रांतीकारी चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने बाबासाहेबांना  दलितौद्धाराच्या कार्याची स्फूर्ती आणि गती मिळाली त्या मुक्तिसंग्रामासाठी महाडचीच निवड का केली?   यामागेसुद्धा बाबासाहेबांचीच दूरदृष्टी आणि त्याच्या जोडीला महाडचा पूर्वाईतिहास होता.

याविषयी बाबासाहेब आपल्या सहकार्‍यांशी जे बोलले त्यावरून त्यांच्या दूरदृष्टीची सहज कल्पना येईल. बोलताना बाबासाहेब म्हणाले घाटमाथ्यावरील अस्पृश्यात मी गेली दोन वर्षे खूप जागृती केली आहे. आणि हा वणवा, आता मला कोकणात पेटवायचा आहे. कोकणी माणसे काटक आणि लढायला आसुसलेली असतात. या महाडच्या बंडात त्यांना पुरेपूर संधी मिळणार आहे. ही सारी माणसे हिंदू धर्मातील ब्राम्हणी विचारसरणीची गुलाम होऊन बसलेली आहे. या गुलामगिरीला चांगला धक्का बसावा आणि तो अस्पृश्यांच्या क्रांतीकारक समतेच्या चळवळीतून बसावा असे मला वाटते. हा बाबासाहेबांचा मनोदय पुढे कसा शंभर टक्के खरा ठरला हा इतिहास जगाला माहीत आहेच. महाडच्या या क्रांतीकारी मुक्तिसंग्रामाला मिळालेल्या अदभूतपूर्व यशाला आणखी एक गोष्ट जबाबदार आहे ती म्हणजे महाडचा पूर्वाईतिहास. बुद्ध काळापासूनच महाड हे व्यापारी दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठिकाण होते. गव्हाचा आणि मधाचा व्यापार येथे मुख्य होता. आजूबाजूच्या परीसरातली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून महा हाट. त्याचाच पुढे महाड असा अपभ्रंश झाला. असा तज्ञांचा दावा आहे. आजसुद्धा रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्याच्या सीमा महाडला लागूनच आहेत॰  त्याकाळी येथे कोकणातून आलेल्या सी.के.पी.(चांद्रसेनीय कायस्थ प्रभू) या समाजाची मोठी वस्ती होती. हा समाज शिवछत्रपतींच्या काळापासूनच अतिशय प्रामाणिक, लढवय्या, आणि काटक होता. महाराजांना स्वराज्य निर्माणात यांचा फार उपयोग झाला. बाजी प्रभू हे सर्वांना माहीत असलेल्यापैकी आणि स्वराज्याच्या कामी आलेल या समाजाचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि यावरून हा समाज कसा होता याची कल्पना आपल्याला करता येईल. पण हा समाज देखील ब्राम्हणी विचारसरणीच्या अत्याचाराचा अनेक वर्षे बळी ठरत आला होता आणि म्हणूनच तो पेटून उठण्यासाठी संधीची वाट बघत होता, जी त्यांना या मुक्तिसंग्रामच्या निमित्ताने मिळणार होती, नव्हे बाबासाहेब त्यांना ती मिळवून देणार होते. ज्या तळ्याचा उपयोग या सत्याग्रहात होणार होता ते चारही बाजूंनी तटबंदी असलेले, चार दरवाजे असलेले आणि पुर्णपणे ब्राम्हण वस्तींनी घेरलेले असे होते. त्यामुळे त्याला संपूर्ण महाड शहरात अर्थातच अत्यंत महत्व होते. चार दरवाज्यांमुळे त्याचे खरे नाव चौदार तळे असे  असावे,  जे पुढे चवदार तळे म्हणून प्रशिध्द झाले असाही तज्ञांचा एक अंदाज आहे.

    पूर्वी रायगड, व त्याचा परिसर छत्रपती शाहू महाराजांनी यशवंत पोतनीस – सी.के.पी., यांच्या अखत्यारीत दिला, पुढे विठ्ठल यशवंत पोतनीस याच्या अखत्यारीत राहीला. मृत्यूसमयी छत्रपतींनी पेशव्यांना सारे अधिकार दिले पण महाडसह रायगडचा परिसर तसाच स्वतंत्र राहीला. जेंव्हा पेशव्यांनी आप्पाजी हरी याला सैन्य देवून रायगड घेण्यासाठी पोतनीसांवर पाठवले त्यावेळी रायगडाचे रक्षण करण्यासाठी रायनाक महार याने मोठा पराक्रम गाजवला. तो युद्धात कामी आला तेव्हापासून पोतनीस, रायनाकांना रायगडाचे रक्षक मानतात. इतिहासात झालेले पोतनीस व रायनाक या दोन जमातीचे हे एकत्रीकरण पुढे अधिकच भक्कम होत गेले.

महाड जवळ असलेल्या ऐतिहासिक दासगाव जेथे मेणे वाहणार्‍या भोई जमातीची लोकवस्ती होती. कान्होजीने अनेक हल्ले या गावाजवळूनच केले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी अनार्य दोष परिहार समाज नावाची संस्था काढून तीच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यासाठी प्रयत्न करणारा बंडखोर गोपाळबुवा वलंगकर याच गावाचा. या संस्थेच्या कार्याचा आणि  या परिसराचा गौरव करताना बाबासाहेबांनी अस्पृश्योन्नतीची चळवळ प्रथम सुरू करणारी संस्था आणि प्रांत असे गौरओद्गार काढले. अशा या गोपाळबुवांचा महाडमध्ये संबंध आला तो ज्यांनी  आगरकरी विचारांना महाडमध्ये सर्वप्रथम आणले अशा गोविंद टिपणीसांशी, गोविंद टिपणीसांनी आपली कन्या, ज्यांनी बाबासाहेबांबरोबर काम केले, जुन्या रुढीविरुध्द बंड करून उठले, असे सुधारक विचारांचे श्री अनंतराव चित्रे यांना दिली. यामुळे पोलादपूरचे चित्रे घराणे महाडच्या टिपणीस घराण्याशी जोडले गेले. यातूनच तयार झालेली  भाई उर्फ अनंतराव चित्रे आणि सुरबा उर्फ सूरेंद्रनाथ टिपणीस यांची जोडी चवदार तळ्याच्या घटनेशी संबंधीत सर्वात बंडखोर जोडी ठरली.

सुरबा टिपणीसांनी महाड नगरपालिकेचे अध्यक्ष होताच ०५ जानेवारी १९२४ ला गावातील सर्व पाणवठे अस्पृश्यांसाठी खुले करण्याचा ठराव मंजूर करुन घेऊन, या मुक्तिसंग्रामाची बीजे केव्हाच रोवली होती. संग्रामाची तारीख बाबासाहेबांनी सर्वानुमते शनिवार व रविवार दि. १९ व २० मार्च १९२७ अशी निश्चित केली आणि महाडचा उत्साह दुथडी भरून वाहायला लागला.

आम कोकणवासीय अस्पृश्यांनी सर्वस्व अर्पून या लढ्यात उतरावे, मुंबईत लाखो कोकणवासीय अस्पृश्य आहेत त्यांच्या पर्यन्त हे वारे पसरवावे. आणि कोकणात झंझावाती प्रचार करावा. कारण तुमच्याच  मंडळींच्या हिमतीवर व तयारीतून हे सगळे घडणार आहे. अशा अनेक सूचना बाबासाहेब कार्यकर्त्यांना करत होते. संपूर्ण कोकण सिंहाच्या डरकळ्यांनी थरारून गेला. कार्यकर्त्यांमधे नवा जोश चढला होता बाबासाहेबांच्या विचारांनी ते मंत्रमुग्ध होत होते. आम्ही आमचे तन मन धन पणाला लावू, वस्त्या वस्त्यातून सभा घेऊन प्रचार करू असे वचन त्यांनी बाबासाहेबांना दिले, सर्वच थरातील कार्यकर्ते जणू पेटून उठले होते, प्रत्येकाला या रणसंग्रामात सहभाग नोंदवायचा होता, प्रत्येकालाच या सुवर्ण घटनेचे साक्षीदार व्हायचे होते. संपूर्ण महाडच या दिवसाची जणू कितीतरी युगांपासून वाट बघत होता, आता महाडच्या रक्तारक्तातून संघर्षाचा वणवा वाहणार, हे नक्की झाले होते. आणि यामुळेच विषमतावादी विचारांच्या मंडळींना संकट पडले होते.  कारण या परिषदेने त्यांना आव्हान दिले जाणार होते, काय करावे नी काय नको असे या मंडळींना झाले होते.

ही परिषद १९ व २० मार्चला यशस्वी करून दाखवण्याचा निर्धार केल्यावर खरे आव्हान  होते ते या परिषदेसाठी जागा शोधण्याचे.  कारण परिषद अस्पृश्यांची म्हंटल्यावर मंदिर मिळण्याची शक्यता तर नव्हतीच. त्यातच या परिषदेसाठी अलोट जनसमुदायही जमणार हे निश्चित होते.  तेव्हा तशीच जागा शोधणे आवश्यक होते. शेवटी विरेश्वराच्या देवळालगतच्या विरेश्वर थिएटर ही जागा निश्चित झाली.

१९ मार्च १९२७ ला दुपारी विरेश्वर थिएटरमध्ये  परिषद सुरू झाली. सहकारी चळवळीचे पुरस्कर्ते बापूसाहेब सहस्रबुद्धे आणि भाई चित्रे हे दोन वक्ते होते. हे दोघेही स्पृश्य होते. परिषदेचे संपूर्ण नियोजन नानासाहेब टिपणीसांनी पाहीले. ही ऐतिहासिक परिषद या अर्थाने देखील मोठी होती कारण ती बाबासाहेबांचे भावी कार्य देखील निश्चित करणार होती. ही परिषद यशस्वी करण्यासाठी महाडचे सर्व सुधारक मंडळी, त्यात स्पृश्य अस्पृश्य दोघेही एकत्र आली होती. परिषदेतील बाबासाहेबांच्या भाषणाने तर संपूर्ण जनसामुदाय पेटून उठला, मंत्रमुग्ध झाला.  दुसर्‍या दिवशी २० मार्च १९२७ चा तो जादुमय दिवस उगवला ज्याची सर्वजण वाट पाहत होते. सकाळी ९ वाजता अधिवेशनाचे पुढील काम सुरू झाले. सुमारे ३३ ठराव यावेळी मंजूर झाले. सर्वांची भाषणे झाली आणि अनंतराव अभारप्रदर्शनाला दुजोरा देणारे भाषण करायला उभे राहीले. बोलता बोलता ते म्हणाले स्पृश्यास्पृश्य बंधूंनो ! आता भर दुपारची वेळ झाली आहे. ग्रीष्म ऋतुतल्या कडक उन्हामुळे आपल्या सर्वांना तहान लागली आहे. चवदार तळे सार्वजनिक असून अस्पृश्यांना मोकळे असण्याचा महाड म्युनिसिपालिटीचा ठराव आहे. ह्या परिषदेसाठी आपण पैशाला हंडाभर पाणी ह्या दराने ४०/- रु. चे पाणी विकत घेतले. पण आता आपण सर्व स्पृश्यास्पृश्य बंधु आपली मिरवणूक घेऊन तळ्यावर जाऊ या आणि आपली तहान शांत करू या. आज एवढी महत्वाची परिषद इथे भरली आहे तिने काहीतरी महत्वाचे काम केल्याखेरीज आपले आधिवेशन संपू नये असे मला मनोमन  वाटते. या महाड शहरात पाणी पिण्याची प्रचंड गैरसोय आहे. ही गैरसोय दूर व्हावी म्हणून येथील मुनिसिपालटीने येथील सर्व तळी सर्व जातीच्या लोकास खुली केली आहे. परंतु त्या तळ्यावर पाणी भरण्याचा प्रघात जर आज या परिषदेने पाडून दिला तर या परिषदेने एक महत्वाची कामगिरी बजावली असे म्हणता येईल. तरी आपण सर्वांनी अध्यक्षांसह महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन पाणी पिऊ या. अनंतरावांची ही सूचना अनपेक्षीत होती, पण भारलेली होती. प्रत्येकाच्या मनातली होती, म्हणूनच प्रतिनिधींनी ती उचलून धरली.  १९ व २० या दोन्हीही दिवशी स्पृश्यांनी केलेली भाषणे, भानूदास कांबळी याचे भाषण व बाबासाहेबांचे भाषण हे विशेष प्रभावी ठरले आणि अनंतरावांच्या सूचनेने ठिणगीचे काम केले. आता पुढे काय घडणार आहे याचा विचार विषमतावादी विचार सरणीची मंडळी करत असतानांच एका अद्भुतपूर्व सामाजिक क्रांतिचे पाऊल पडायला सज्ज झाले होते.

अनंतरावांच्या ठिणगीने पेट घेतलेली  प्रत्येक मनाची मशाल अधिकाधिक पेटतच पुढे घाटाच्या दिशेने निघाली होती. या पेटत्या मशालींच्या जथ्थ्यात बाबासाहेब, बापूसाहेब, अनंतराव, शांताराम पोतनीस, शिवतरकर, सुरबानाना, दादासाहेब गायकवाड, भाईशेट वडके, मोरे, सुभेदार सावादकर, रघुनाथ मास्तर, चंद्रकांत अधिकारी, अशी मंडळी पुढे तर बाकी कार्यकर्ते चार चारच्या लाईनीत त्यांच्या मागे मागे अशी मिरवणुकीने शहरातून, गल्लीतून, गाडीतळावरून तळ्याच्या दिशेने निघाली होती. बाबासाहेबांचा जयजयकार होत होता, पायाची गती लयीत वाढत होती. मनात जोश भरत चालला होता, वातावरणात मात्र कमालीची शांतता होती.  ही वादळापूर्वीची तर शांतता नसेल ना? अशी पाल प्रत्येकाच्या मनात चुकचुकत होती. तळ्याच्या एका प्रवेशदाराजवळ शहा बहिरीच्या घाटावर हा मोर्चा येऊन धडकला, काय घडणार आहे याचा अंदाज, तेथे जमा झालेला रूढीप्रिय जमाव बांधण्याचा प्रयत्न करत होता.  आणि तसा तसा तो अस्वस्थ होत होता. आता चवदार तळ्याला अस्पृश्यांचा स्पर्श होणार या विचारांनीच त्यांच्या अंगाची लाही लाही होत होती. चारही दरवाजां जवळ या मंडळींनी गर्दी केली होती. काय चालले आहे हे डोळ्यात रक्त आणून बघण्याचे काम चालले होते. सर्वत्र भयाण शांतता, काहीतरी अकल्पित, अगम्य घडणार आहे याची जाणीव दोन्हीकडील जमावाला येत होती. बाबासाहेब एक एक पायरी खाली उतरायला  लागले आणि सर्वाच्याच शरीरावर रोमांच उभे राहीले. सूर्याला साक्षी ठेऊन बाबासाहेबांनी एकवार सर्वांकडे पाहीले, थोडावेळ त्यांच्याही अंगावर रोमांच उभे राहीले असेल, कारण एका अदभूतपूर्व पर्वाची सुरवात आपण करत आहोत हे त्यांना ज्ञात होते. पण तरीही ते अतिशय शांत होते. ज्या पायरीवर पाणी होते, त्या पायरीपर्यंत पोहचल्यावर बाबासाहेब हळूच खाली वाकले. पाण्याचा पहीला घोट घेतला. त्यानंतर एकामागून एक असे अनेक आकंठ घोट घेतले. मात्र यावेळी त्यांचा भरलेला कंठ अनेकांनी पाहीला. आपल्या पूर्वजांपासून अन्याय, शोषण, सहन करत आलेल्या आपल्या बांधवांना यातून मुक्ती देण्यासाठी करणार असलेल्या भगीरथ प्रयत्नांची सुरवात सूर्याच्या साक्षीने त्यांनी केली होती. अनेकांच्या डोळ्यात पाणी चमकले, बघता बघता हजारो ओंजळी भरल्या गेल्या, संपूर्ण चौदार तळे या स्पर्शाने रोमांचित झाले आणि चौदार तळे खर्‍या अर्थाने चवदार झाले. महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह तो हाच. या मंतरलेल्या घटनेचा साक्षी असलेला सूर्य आज पुन्हा एकदा भाराऊन गेला असेल, चला त्या सर्वसाक्षी सूर्याला आज तीच ऊर्जा पुन्हा मागुयात जी त्याने बाबासाहेबांमध्ये प्रत्यक्ष बघीतली होती. कारण अजूनही समाजात बंधुभाव पुरता रुजलेला दिसत नाही, विश्वाबंधुत्वाशी अभिमानाने नाते सांगणार्‍या आमच्या प्रत्येकाच्या मनात चवदार तळ्याचा सत्याग्रह  चालूच आहे अजून, अविरत. तोच यशस्वी करण्यासाठी आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असा समर्थ आणि समरस भारत निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा सिद्ध  होऊ या!

       

काशीनाथ पवार, , पुणे  

समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र   

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *