पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे कचरा डेपोच्या परिसरातील इमारत कोसळल्याच्या घटनेला आता ७० तासांपेक्षा अधिक काळ उलटून गेला असून, बचावकार्य अजूनही अत्यंत वेगाने सुरू आहे. या दुर्घटनेतील सर्वात मोठी आणि दिलासादायक अपडेट म्हणजे, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ८ व्यक्तींपैकी तिघेजण बचाव पथकाला दिसून आले आहेत. एनडीआरएफ आणि महापालिकेच्या यंत्रणांकडून या तिघांना बाहेर काढण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरू असून, आज रात्रीपर्यंत हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मोशी येथील या कचरा डेपोच्या प्रशासकीय इमारतीवर मोठ्या प्रमाणावर कचरा कोसळल्याने ही दुर्घटना घडली होती. घटनेच्या वेळी इमारतीत सुमारे २३ ते २४ नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी ५ जण इमारत कोसळल्यानंतर लगेच बाहेर पडले, तर बचाव पथकाने ९ जणांना सुखरूप बाहेर काढले होते. मात्र, त्यानंतर राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेत एका व्यक्तीचा मृतदेह हाती लागला, ज्यामुळे मृतांची संख्या वाढली आहे. सध्या ढिगाऱ्याखाली ८ जण अडकल्याची अधिकृत माहिती असून, त्यातील तीन जण बचाव पथकाच्या नजरेस पडले आहेत. ढिगाऱ्याचा वरचा मजला अत्याधुनिक मशिनरीच्या साहाय्याने क्रश करून बाजूला करण्याचे काम सुरू असून, शेवटच्या मजल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न रेस्क्यू टीम करत आहे.
या दुर्घटनेनंतर इमारतीच्या बांधकामाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रशासकीय इमारतीला केवळ तळमजल्यासाठी परवानगी देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात त्यावर दोन मजले बेकायदेशीरपणे बांधण्यात आले होते. या अनधिकृत बांधकामावर महापालिकेने वेळीच कारवाई का केली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी या अनधिकृत मजल्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले आणि या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे सांगत पळ काढला. तथापि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आढावा बैठक घेतली असून, जे कोणी या घटनेत दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी शासनाने आणि संबंधित कंत्राटदाराने मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये, महापालिका प्रशासनाकडून १० लाख रुपये आणि ‘अँटोनी’ या ठेकेदाराकडून २५ लाख रुपयांची मदत मृतांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, पीडित कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च देखील उचलला जाणार आहे. मोशी येथील कचऱ्याचा डोंगर लवकरात लवकर कमी करण्यासाठी बायो-मायनिंग प्रक्रियेला गती देण्याचे आणि शहरात कचरा प्रक्रियेचा दुसरा प्रकल्प तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील. सध्या संपूर्ण यंत्रणा ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.















