पृथ्वीराज चव्हाणांचा दावा सुप्रिया सुळेंनी फेटाळला; खासदारांनी पक्ष बदलला तर राजीनामाच द्यावा लागेल’, सुळेंचा संसदेत नव्या विधेयकाचा पवित्रा

निवडणूक प्रक्रियेतील घोडेबाजार थांबवण्यासाठी सुप्रिया सुळे संसदेत मांडणार खाजगी विधेयक
निवडणूक प्रक्रियेतील घोडेबाजार थांबवण्यासाठी सुप्रिया सुळे संसदेत मांडणार खाजगी विधेयक

नाशिक(प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार अस्वस्थ असून ते पक्ष बदलण्याच्या तयारी असल्याचा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावत पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पलटवार केला आहे. आमच्या पक्षातील ८ खासदारांपैकी कोणीही पृथ्वीराज बाबांची भेट घेतलेली नाही, असे स्पष्ट करतानाच सुळे यांनी लोकप्रतिनिधींना ‘वस्तू’ (कमोडिटी) समजणाऱ्या वृत्तीवर कडाडून प्रहार केला आहे. निवडून आल्यावर पाच वर्षे कोणालाही पक्ष बदलता येणार नाही आणि बदलायचा असल्यास त्याला राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जावे लागेल, असे ‘खाजगी विधेयक’ आपण आगामी संसदीय अधिवेशनात मांडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

नाशिक दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना सुळे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, चव्हाण हे मोठे नेते आहेत, मात्र आमच्या खासदारांशी त्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही. “गेल्या आठ दिवसांत केवळ माझाच त्यांच्याशी संपर्क झाला होता, तोही माझ्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी,” असे त्यांनी मिश्किलपणे स्पष्ट केले.

अधिक वाचा  राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे पुण्यात निधन

अमोल कोल्हे यांच्या विधानाबाबत बोलताना त्यांनी विरोधकांना ‘निवडक विस्मृती’ (Selective Amnesia) झाल्याची टीका केली. कोल्हे यांनी महायुतीकडून ऑफर आल्यावर विचार करू, असे त्यांच्या शैलीत म्हटले होते, मात्र त्यानंतर त्यांनी आपली भूमिका वारंवार स्पष्ट केली आहे, हे विसरले जाते, असे त्या म्हणाल्या.

राज्यातील प्रशासकीय गलथान कारभारावर बोट ठेवताना सुळे यांनी इगतपुरीतील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा उपस्थित केला. “प्रशासन मोजणी करताना तंत्रज्ञानाचा आणि गुगल मॅपचा वापर करते, मग त्यांच्या डोळ्यादेखत दोन-दोन मजल्यांच्या बेकायदेशीर इमारती कशा उभ्या राहतात?” असा संतप्त सवाल त्यांनी विचारला. अपघाताची वाट न पाहता प्रशासनाने या बेकायदेशीर कामांवर कारवाई करण्याची आणि जबाबदारी  घेण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

राज्यात पोलिसांची भीती उरली नाही

अधिक वाचा  खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करु शकलो असतो परंतु....गोपीचंद पडळकरांचा पलटवार

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त करताना त्यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा आणि ड्रग्सच्या संकटाचा उल्लेख केला. पुण्यात शिक्षणासाठी येणारी मुले ड्रग्सच्या आहारी जात असून, पोलिसांची भीती राज्यात उरली नसल्याचा आरोप त्यांनी केला. एका नगरसेवकाने पोलिसांवर हात उचलल्याच्या घटनेचा निषेध करत त्यांनी अशा गुंडगिरीला पक्षात स्थान नसावे, असे स्पष्ट केले.

लाडकी बहीण योजना : एसआयटी चौकशी करा

राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवरही त्यांनी सडकून टीका केली. ८० लाख महिलांना केवायसीच्या नावाखाली योजनेतून बाहेर काढणे हे सरकारचे अपयश असून यात मोठी फसवणूक झाल्याचा दावा त्यांनी केला. या योजनेत पुरुषांची नावे कशी आली, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी याची ‘एसआयटी’ (SIT) चौकशी करण्याची मागणी केली. केवळ निवडणुकीसाठी अशा योजना जाहीर केल्या जात असून राज्याचे आर्थिक गणित (Fiscal Management) कोलमडले असल्याचा आरोप त्यांनी केला.

अधिक वाचा  वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण : कर्नाटकच्या माजीमंत्र्याच्या मुलासह पाच जणांना अटक

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्यांनी भारतीय जनता पक्षाला धारेवर धरले. अयोध्या, उज्जैन आणि आता सिद्धिविनायक मंदिरात भ्रष्टाचाराचे आरोप होणे हे अत्यंत ‘गलिच्छ’ असल्याचे त्या म्हणाल्या. ज्या नेत्यांनी राम मंदिरासाठी आयुष्य वेचले, त्यांच्या विश्वासाला हे सरकार तडा देत आहे. विरोधी नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्यांना पक्षात घेऊन ‘वॉशिंग मशिन’मध्ये धुवून स्वच्छ करायचे, हा भाजपचा दुटप्पीपणा आता उघडा पडला आहे, अशी टीका त्यांनी केली.

संसदेतील कामकाजाबद्दल बोलताना त्यांनी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्या ‘आउटस्टँडिंग’ कामगिरीचे कौतुक केले. शेवटी, पवार कुटुंबियांत सध्या लग्नाचे वारे वाहत असून पार्थ पवार आणि इतर मुलांच्या लग्नाची ‘गोड बातमी’ लवकरच मिळेल, असे सांगत त्यांनी कौटुंबिक आनंदही व्यक्त केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love