पालकांनी पुढील पिढी संस्कारित होण्यासाठी वाचन संस्कृती जोपासावी-साहित्यिका मंगला गोडबोले

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे–वाचन अथवा कोणतीही संस्कृती ही कधीच मरत नाही. कारण ती माणसाची आंतरिक गरज असते. जर आपण आपल्या घरात चांगले वाचन केले, चांगले विचार केले, चांगली वर्तणूक केली तर आपली मुलंदेखील त्याचेच अनुकरण करीत असतात. पुढील पिढी कदाचित वेगळं वाचत असेल. मोबाइलवर वाचत असतील पण ते वाचत असतात. त्यामुळे वाचन संस्कृती कधीच मरणार नाही, मरत नसते. पालकांनीदेखील संस्कारक्षम पिढी निर्माण होण्यासाठी वाचन संस्कृती जोपासावी, असे विचार ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले यांनी आज व्यक्त केले.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत ‘तेजस्विनी’ पुरस्कार प्रदान कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित डॉ. मंजुषा कुलकर्णी (मुंबई) आणि सोनाली नवांगुळ (कोल्हापूर) यांना त्यांच्या हस्ते ‘तेजस्विनी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. देवीची प्रतिमा, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. जयश्री बागुल होत्या. तसेच पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल हेदखील याप्रसंगी उपस्थित होते.

मंगला गोडबोले पुढे म्हणाल्या की, आपण आज नवरात्राच्या निमित्ताने डॉ. मंजुषा कुलकर्णी आणि सोनाली नवांगुळ या सहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित लेखिकांना पुरस्कार देऊन गौरव करीत आहोत. याचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, देवीची नऊ रूपे आहेत. त्यापैकी दुर्गादेवीचे रूप आपण दृश्य स्वरूपात बघत असतो पण त्याचबरोबर अन्नपूर्णा, शाकंबरी, लक्ष्मी, सरस्वती, सटवाई अशीही अन्य देवीची रूपे आहेत. या सर्वच रूपांत देवीने युद्ध केलेले नाही. पण त्यांच्यात तेवढीच ताकद आहे. त्यामुळे या नवदुर्गांचाही प्रभाव आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करू या आणि त्यांच्यातील चांगले गुण आपल्यात आत्मसात करू या, असे म्हणून त्यांनी या दोन्ही लेखिकांचे कौतुक केले व आगामी कार्यक्रमांमध्ये पुस्तकेदेखील सन्मानाबरोबर भेट द्यावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रारंभी विसाव्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित डॉ. मंजुषा कुलकर्णी आणि सोनाली नवांगुळ यांचा आदर्श सर्वच तरुणी व महिलांनी घ्यावा असे सांगून त्या म्हणाल्या की, ‘प्रत्येक स्त्रीने शिक्षण घेतलेच पाहिजे. मराठीत अनेक महिलांनी उत्तम साहित्य निर्माण केले असून, भविष्यात मराठी साहित्यकृतीलादेखील साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात व्यक्त केली.

सत्काराला उत्तर देताना डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी प्रथम संस्कृतमध्ये बोलण्यास सुरुवात केली व पुढे त्या मराठीत म्हणाल्या की, गेल्या दीड वर्षात करोना परिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर नव्याने कामासाठी, लेखनासाठी प्रेरणा देणारा हा पुरस्कार आहे. कोणतीही हिंसा ही केवळ शारीरिक नसते तर कायिक, वाचिक, मानसिकही असते. संस्कृत भाषा ही मनावर अलंकार सजवणारी भाषा आहे. या भाषेने प्रत्येकाने आपल्या आत्म्याला अलंकृत करावे. संस्कृत माझा आत्मा आहे, ध्यास आहे, श्वास आहे. असे त्यांनी सांगितले. त्या महाराष्ट्र शासानच्या भाषा संचालनालयाच्या संचालक झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला संस्कृत भाषेत ब्रीदवाक्य दिले तसेच दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे करण्यात आलेली महाराष्ट्राची मुद्रादेखील भाषिकदृष्ट्या दुरुस्त केली याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

यानंतर साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित सोनाली नवांगुळ या व्हील चेअरवरून कार्यक्रमात आलेल्या होत्या. त्यांना पुरस्कार प्रदान करताना केवळ मंचावरीलच नव्हे, तर उपस्थित सर्व प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना मानवंदना दिली. त्यामुळे सारेच वातावरण भारून गेले होते. सत्काराला उत्तर देताना सोनाली नवांगुळ म्हणाल्या की, या करोनाच्या काळामुळे अपंग, अंध व्यक्तींवर समाजाकडून जो एकांतवास लादला जातो तो एकांतवास किती भीतीदायक व क्लेशदायक असतो हे समाजातील सर्व सुदृढ माणसांनी यावेळी अनुभवले, असे सांगून त्या पुढे म्हणाल्या की, कोणतीही व्यक्ती ही कधीच परिपूर्ण नसते. आपण सर्व जण एकमेकांना मदत करीत त्या व्यक्तींमध्ये परिपूर्णता आणत असतो आणि हे मी माझ्या 14 वर्षांच्या कोल्हापूरमधील मुख्य प्रवाहातील वास्तव्यानंतर अनुभवातून सांगत आहे. कोणत्याही गोष्टीची एक चौकट झाली की त्यातून नकारात्मक विचार उद्भवतात. त्यामुळे चौकट तोडून त्यातून प्रत्येकाने बाहेर पडणे आवश्यक आहे. म्हणजे त्यामुळे नकारात्मक विचारातून आपण बाहेर पडलो आपले विचार चांगले राहतील. साहित्य अकादमीच्या पुरस्कारामुळे पुढील लिखाणासाठी अधिक प्रेरणा मिळाली. हा पुरस्कार म्हणजे मी देवीचा आशीर्वाद मानते,’ असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले. आभार प्रदर्शन महिला महोत्सवाच्या उपाध्यक्षा निर्मला जगताप यांनी केले.

या कार्यक्रमाचे इव्हेंट कोऑर्डिनेशन सुनील महाजन, निकिता मोघे यांसह नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, अमित बागुल, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर व राजू बागुल यांनी केले. करोना परिस्थितीच्या निर्बंधांचे काटेकोर पालन करून हा कार्यक्रम संपन्न झाला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *