कोविड19 विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच-संशोधनाअंती पुण्यातील शास्त्रज्ञ दाम्पत्याचा निष्कर्ष

आरोग्य राष्ट्रीय
Spread the love

पुणे-जगामध्ये लाखोंचे जीव घेणाऱ्या कोविड19 विषाणूच्या उत्पत्तीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच हा विषाणू आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, चीनने त्याचा इन्कार केला होता. अजूनही त्यावरून अनेक तर्कवितर्क आणि दावे-प्रतिदावे सुरू आहेत. दरम्यान,याबाबत पुण्यातील शास्त्रज्ञ दाम्पत्याने सखोल अभ्यासाअंती हा विषाणू चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच आल्याचा दावा केला आहे. विविध शोधप्रबंध, वैद्यकीय अहवाल तसेच नामांकित जर्नलमध्ये प्रसिद्ध लेखांचे अध्ययन करून हे दाम्पत्य या निष्कर्षाप्रत पोहोचले आहे.

जागतिक महामारीला कारणीभूत असलेल्या नॉवेल कोरोना विषाणू अर्थात कोविड-१९ हा आजार कुठून आला, याबद्दल सर्वत्र उत्सुकता आहे. सुरुवातीला नॉवेल कोरोना विषाणू हा चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेमधून किंवा वुहान येथील जिवंत प्राणी विकण्याच्या बाजारातून अपघाताने बाहेर पडला असावा, असा संशय व्यक्त केला जात होता. पण चीनने तो तेथून आला नसल्याचा दावा केला. तसेच, त्याची उत्पत्ती कोठे झाली असावी, याचीही माहिती चीनने दिली नाही. जागतिक स्तरावरही हे शोधण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. या संदर्भात  डॉ. मोनाली रहाळकर आणि डॉ. राहुल बहुलीकर या शास्त्रज्ञ दाम्पत्याला काही धागेदोरे हाती लागले आहेत.

याबाबत माहिती देताना डॉ. मोनाली रहाळकर म्हणाल्या की, या विषाणूचे मूळ शोधण्याचा निर्धार आम्ही केल्यानंतर प्रथम या विषाणूचा क्लोज रिलेटिव्ह (आरएटीजी-13) शोधण्यास सुरुवात केली. दरम्यान, आम्हाला हा विषाणू आणि दक्षिण चीनमधील मोजियांगमध्ये बंद अवस्थेत असलेल्या कॉपरच्या खाणीशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. वॉल स्ट्रीट जर्नलमधील वृत्तानुसार, ही खाण बंद असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात वटवाघळांनी आश्रय घेतला होता. 2012 मध्ये या खाणीची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या सहा कर्मचारी गंभीर आजारी पडले होते. त्यांच्यात ताप, खोकला, रक्ताच्या गुठळ्या, निमोनिया अशी कोरोना रुग्णात आढळणारी लक्षणे दिसून आली होती. काहींच्या फुफ्फुसातील धमन्यांमध्ये ब्लॉकेजही आढळून आले. यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

तत्पूर्वी, वटवाघळांच्या विष्ठेवरून चालल्याने किंवा स्पर्श झाल्याने तिचे धुळीत रूपांतर होते. त्यातील घटक वातावरणात विखरून श्वास घेताना ते हवेमार्फत शरीरात जाऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले. या कर्मचार्‍यांचे रेडिओलॉजिकल अहवाल तपासले असता जगभरातील विविध कोरोना रुग्णांचे अहवाल आणि त्यांच्या अहवालात साध्यर्म आढळून आले. या खाणीतून गोळा केलेल्या नमुन्यांवरून सार्सचा पुढील क्लोज रिलेटिव्हचाही आम्हाला शोध लागला. डॉ. राहुल बहुलीकर म्हणाले की, मे 2020 मध्ये याबाबत एक पेपर प्रसिद्ध केल्यानंतर द सिकर नामक ट्विटर यूजरने आमच्याशी संपर्क केला. त्याने खाणीतील कर्मचार्‍यांमधील लक्षणांशी निगडित एक शोधप्रबंध आमच्या निदर्शनास आणला.

या कर्मचार्‍यांना उपचारादरम्यान दिलेली औषधे आणि आता कोरोना रुग्णांना दिली जाणारी औषधे ही एकसारखी असल्याचे आमच्या निदर्शनास आले.  पल्मोनोलॉजिस्ट आणि चीनमधील कोरोना डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या झोंग नानशान यांनी या कर्मचार्‍यांचे प्रकरण तपासले असता हा व्हायरल इन्फेक्शनचा प्रकार असल्याचा निष्कर्ष काढला होता, असेही रहाळकर आणि डॉ. बहुलीकर यांनी नमूद केले आहे. हा विषाणू प्रयोगशाळेतून लीक झाला हे अगदी ठामपणे सांगता येणार नसले तरी, आमचा शोध त्याकडेच इशारा करीत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *