पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी सन २००९ मध्येच शिवसेना-राष्ट्रवादीची युती होणार होती असा गौप्यस्फोट शिवसेनेचे शिरुर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पवार यांना पंतप्रधान करण्याकरता शिरुर लोकसभा मतदार संघातून शरद पवार निवडणुक लढणार होते. मात्र, मी स्वतः विरोध केल्याने हा डाव फसला असा दावा करतानाच २००९ चा हा फसलेला डाव मात्र २०१९ ला झाला असेही आढळराव पाटील म्हणाले.
आढळराव पाटील यांनी मंगळवारीं लांडेवाडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट केला.
आढळराव पाटील म्हणाले, महाविकास आघाडीची ही युती २००९ लाच होणार होती. मला त्यावेळी तसे सांगण्यात आले होते की, राष्ट्रवादी आणि शिवसेना युती फायनल झालेली आहे. यासाठी उद्धव ठाकरेंची सभा रद्द केली जाणार होती. का? तर शरद पवार हे शिरूरमधून आणि मला मावळमधून लढवायचे होते. मात्र, मला गृहीत धरू नका, असे म्हणून मी बाहेर पडलो आणि मग ही युती करायचे रद्द झाले. तर मला राज्यसभा खासदार करणार, असे म्हणाले होते. मात्र आपण त्यासही नकार दिला असे ते म्हणाले. दरम्यान, २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना युतीची कल्पना आढळराव पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांना दिल्यानंतर ही युती तुटली असे, त्यांनी सांगितले. आजही आम्ही मनाने उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. जर काँग्रेस सोबत गेलो, तर माझे दुकान बंद करू, हे सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते, असे आढळराव म्हणाले.
आढळराव पाटील पुढे म्हणाले, माझी हकालपट्टी झाली. मी काय गुन्हा केला होता. मी शिवसैनिकांच्या जोरावर निवडून आलो. एक अभिनंदनाची पोस्ट केली म्हणून माझी हकालपट्टी केली गेली. मी माघार घेतली मात्र पुण्यातून लढा म्हणतात हा कुठला न्याय, ज्यांनी आमचं आयुष्य संपवल त्या राष्ट्रवादीसोबत का मिळत जुळत घ्यायचं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपल्यावर शिवसेनेने अन्याय केला असून मनाला खूप वेदना झाल्याचे सांगत १८ वर्ष प्रामाणिक राहून माझी आधी हकालपट्टी केली आणि मग सारवासारव केली हे पटलं नाही मनाने शिवसेने सोबत असून सोबत मात्र एकनाथ शिंदेच्या आहे असं त्यांनी म्हटलंय.
उद्धव ठाकरे यांनी मला मुंबईला बोलावून मीटिंग मध्ये जखमेवर मीठ चोळलं. संजय राऊत यांनी पुणे लोकसभा निवडणूक लढण्याचं सांगितलं. राष्ट्रवादी सोबत जुळवून घ्या अस सांगितलं पण ज्या पक्षासोबत एकहाती लढा दिला त्यांच्या सोबत जुळवून कसं घेणार? असाही पूनरुच्चार त्यांनी केला.
राष्ट्रवादीने शिवसेनेला संपवण्याचं काम केलं
शिवसेनेला सातत्याने राष्ट्रवादीने संपवायचाचं प्रयत्न केला. २००४ ते २०२२ या कालावधीत मला राष्ट्रवादी कडून खूप त्रास झाला. तरीही एकाकी लढा दिला राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधून ठेवली होती असाही आरोप यावेळी आढळराव पाटील यांनी केला
सरकार मध्ये असूनही गेली अडीच वर्ष राष्ट्रवादीने त्रास दिला. न्याय मिळाला नाही. खेड पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीने दहशतीच्या जोरावर त्रास दिला. मुख्यमंत्री आमचा मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यानी सेनेच्या लोकांना जेलमध्ये टाकलं. दिवसाआड त्यांचं कुटुंबीय माझ्याकडे यायचे मात्र न्याय मिळाला नाही. न्याय आणि विधी खात आमच्या मुख्यमंत्र्यांकडे असूनही न्याय मिळाला नाही असा उद्वेग आढळराव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.