सीबीएससीच्या अभ्यासक्रमातील फाळणीच्या इतिहासामुळे वेदनेऐवजी रक्तपात, हिंसा आणि कटुता रुजण्याची शक्यता अधिक – शरद पवार

पुणे-मुंबई राजकारण
Spread the love

पुणे- सध्याच्या सीबीएससीच्या अभ्यासक्रमातील (CBSE Syllabus) फाळणीच्या इतिहासामुळे वेदनेऐवजी रक्तपात (bloodshed), हिंसा(violence)आणि कटुता ( Bitterness) रुजण्याची शक्यता अधिक आहे. तरुणाईच्या मनात ही भावना रुजणं हे देशहिताच्या दृष्टीनं योग्य नाही, सीबीएससी बोर्डानं याचा विचार केला पाहिजे,असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. (The divisive history of the CBSE curriculum is more likely to instill bloodshed, violence and bitterness than pain.)

सरहद (Sarhad) संस्थेच्या धनकवडी येथील ‘सरहद पब्लिक स्कूल’च्या (Sarhad Public School) नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ आणि गोपाळ कृष्ण गोखले प्रबोधिनीचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. नूतन इमारतीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde), उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील(Chandrkant Patil) , शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, संत सिंग मोखा, शैलेश पगारिया, सरहदचे अध्यक्ष संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, अनुज नहार आदी मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘देशासमोर असणारे प्रश्न सोडवण्यासाठी येणारी नवी पिढी वैचारिकदृष्ट्या सशक्त असली पाहिजे. ती होण्यासाठी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपण काय बिंबवतो आहोत, हेही पाहायला हवे. सध्याच्या सीबीएससीच्या अभ्यासक्रमातील फाळणीचा इतिहास वाचला तर त्यातून वेदनेऐवजी रक्तपात, हिंसा आणि कटुता रुजण्याची शक्यता अधिक आहे. तरुणाईच्या मनात ही भावना रुजणं हे देशहिताच्या दृष्टीनं योग्य नाही, सीबीएससी बोर्डानं याचा विचार केला पाहिजे.’

‘गोपाळ कृष्ण गोखले यांनी सुधारणेचा कायम पुरस्कार केला. ऐक्याची भूमिकाही अधोरेखित केली. काश्मिर आणि उत्तरेतल्या काही राज्यांना सतत अस्थिरतेचा सामना करावा लागतो. त्यामुळं तिथली तरुणाई अस्वस्थ असते. या अस्वस्थ तरुणाईच्या मनात ऐक्याची आणि देश तुमच्या पाठिशी आहे, ही भावना निर्माण करणे गरजेचे आहे. गोखले यांना अभिप्रेत असलेले हेच काम सरहद संस्था करत आहे.’ असेही पवार म्हणाले.

शिंदे म्हणाले, ‘शिक्षणाची गरज आहे, अशा देशातल्या कमकुवत प्रांतातल्या मुलांना पुण्यात आणून शिक्षणाच्या माध्यमातून उभारी देण्याचा मार्ग कुणाला सुचला नव्हता. सरहद संस्थेनं हे काम केल्यामुळं शिक्षणाच्या माध्यमातून अनेक दुःखितांचे अश्रू पुसण्याचं महत्त्वाचं काम होत आहे.’

पाटील म्हणाले, ‘जगाच्या पाठीवर उदयास आलेल्या अनेक संस्कृती, परंपरा लोप पावल्या. पण भारतीय परंपरा आणि संस्कृती अजून टिकून आहे. त्यात असलेली देण्याची भावना हे त्यामागचे एकमेव कारण आहे. समस्या सोडविण्यासाठी काम करणाऱ्या लोकांना पक्षभेद विसरून इथं मदत करण्याची भावना जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशाला कुणीही संपवू शकत नाही.’

गोपाळ कृष्ण प्रबोधिनीबद्दल सांगताना श्रीराम पवार म्हणाले, ‘गोपाळ कृष्ण गोखले यांनी सामाजिक सुधारणांच्या संदर्भात त्यांनी ठोस भूमिका घेतली. देशात ऐक्य निर्माण व्हावं, जनसामान्यांचं जीवन सुधारावं या बाजूनं ‘थिंक टँक’या भूमिकेबरोबरच ‘डू टँक’ या बाजूनंही कृतिशीलपणे गोपाळ कृष्ण गोखले प्रबोधिनी काम करेल.

नहार म्हणाले, ‘भगतसिंगांना डोळ्यासमोर ठेवत काम सुरू केलं. देशासाठी काय करता येईल हा विचार करत पंजाब-काश्मीरमध्ये काम केलं. काम करत करत शिक्षणाकडे आलो. देशाच्या ऐक्याशी आणि स्वाभिमानाशी तडजोड करायची नाही, हाच विचार मनात बाळगला. इथपर्यंतच्या वाटचालीत अनेकांनी सहकार्य केलं.’

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरहद संस्थेचे हितचिंतक, सहकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात संदीप काळे यांच्या ‘उपेक्षितांचे जगणे’ आणि ‘उमेदीचा अंकुर’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. निवेदन नीरजा आपटे आणि जाहिद भट यांनी केले. आभार अनुज नहार यांनी मानले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *