संघाच्या माध्यमातून व्यक्तीनिर्माणाचे कार्य- प्रा. अनिरुद्ध देशपांडे

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संमाज वेगवेगळे नाही. ते एकरूपच आहेत. समाजातील सज्जनशक्तीचे संघटन करून व्यक्ती निर्माणाचे कार्य संघाच्या माध्यमातून केले जाते असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे अखिल भारतीय कार्यकारीणी सदस्य प्रा. अनिरुद्ध  देशपांडे यांनी केले.

मृदुल प्रकाशनातर्फे ज्येष्ठ स्वयंसेवक रामकृष्ण पटवर्धन लिखित ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक विशाल संघटन समग्र दर्शन’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृतीचे प्रकाशनप्रसंगी प्रा. देशपांडे बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक प्रदीप लोखंडे आणि अध्यक्षस्थानी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे होते.

प्रा. देशपांडे म्हणाले, स्वाभिमानी समाज निर्माण व्हावा या विचाराने संघाच्या कार्य विस्तारात विविध संस्था उभ्या राहिल्या. व्यक्ती,  समाज आणि व्यवस्थेत परिवर्तन होत व्यक्ती निर्माणाचे कार्य संघाच्या माध्यमातून होत आहे. आपत्ती आली की संघ स्वयंसेवक धावत येतात असा विश्वास समाजात निर्माण झाला आहे.  देशभर दुर्बल घटकांसाठी सेवाकार्ये सुरू आहेत.  सामान्यातील सामान्य संघ स्वयंसेवकात असामान्यत्व कुठून येते याचे सर्वांना अप्रूप असते.

ते म्हणाले, समाजातील बंधुभाव जपण्यासाठी अनुभूतीच्या आधारावर संघाचे काम चालते. नि:स्वार्थी मनुष्यबळाच्या आधारावर समाजाच्या एकरूपतेच्या विचारावर काम करणारा संघ म्हणजे संघटन. अशा संघटनेच्या व्यवस्थापनाविषयी नक्कीच समाजात कुतूहल आहे. त्यामुळे अशा ग्रंथांसारखे अधिकाधिक साहित्य निर्माण होईल तसा संघ अजून समजत जाईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

लोखंडे म्हणाले संघटन शक्ती आणि तिची यंत्रणा वापरून भारतातील ८५ हजार खेड्यांपर्यंत संघाचा विस्तार होऊ शकेल, त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक विशाल दर्शन सारखे ग्रंथ विविध भाषांमधून सर्वत्र पोहोचवावे लागतील त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू.

डॉ. कुंटे म्हणाले,  समाजातील सर्व स्तरावर संघ पोहोचविण्यासाठी विविध प्रयत्नांची गरज आहे. विस्तार वाढेल तशी त्याची कार्यपद्धती वाढविण्याची गरज आहे. प्रत्येक खेड्यात  प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचून त्याला संघाशी जोडून घ्यायचे आहे. स्वतःची गरज भागवून प्रत्येकाने आपण समाजाचे काही देणे लागतो याचा विचार ठेऊन समाजासाठी आपल्याला शक्य ते सर्व करावे.

लेखक पटवर्धन म्हणाले, १९२५ मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. नेमकी कोणती भक्कम राष्ट्रभक्तीची विचारधारा या संघटनेच्या मुळाशी आहे याचे जगभर कुतूहल आहे. तब्बल ९६ वर्ष संघाच्या व्यवस्थापनातील गुणसूत्र आजही कशी लागू होतात आणि त्यांचे व्यवस्थापन कसे होते याविषयी तपशील रा.स्व.संघ एक विशाल संघटन या पुस्तकात आहे. संघाकडे आपुलकीने बघणाऱ्या, संघाबद्दल गैरसमज असणाऱ्या आणि संघाला विरोध असणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील प्रश्नांना या पुस्तकाद्वारे विविध शंकानिरसन होणार आहे. असे ते म्हणाले.

मिलिंद कांबळे यांनी प्रास्ताविक तर मिलिंद महाजन यांनी आभार मानले. नरेंद्र गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. आर्या ऐगळहळ्ळी यांच्या पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *