पुढील युद्धे सायबर आणि अंतराळात! भारतीय लष्कर ‘फ्युचर रेडी’ होत असल्याचा लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदींचा दावा

भविष्यातील युद्धे सायबर आणि अंतराळात (Future wars in cyber and space)
भविष्यातील युद्धे सायबर आणि अंतराळात (Future wars in cyber and space)

पुणे(प्रतिनिधी)-भविष्यातील युद्धे ही केवळ जमीन, पाणी किंवा आकाशापुरती मर्यादित नसून ती सायबर, अंतराळ आणि माहितीच्या (कॉग्निटिव्ह) क्षेत्रात लढली जातील, त्यामुळे या बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर आता पूर्णपणे तंत्रज्ञानस्नेही आणि भविष्यासाठी सज्ज ( ‘फ्युचर रेडी’ ) होत असल्याचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी येथे सांगितले. पारंपारिक युद्धभूमीच्या पलीकडे जाऊन आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि सायबर क्षेत्रातील वर्चस्व महत्त्वाचे ठरणार असून, माहितीवर आधारित युद्ध हे भविष्यातील मोठे आव्हान असेल असेही ते म्हणाले.

पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १५० व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलन सोहळा जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आधुनिक युद्धनीती, ‘ऑपरेशन सिंदुर २.०’ ची तयारी आणि भारतीय लष्करातील आमूलाग्र बदलांवर सविस्तर प्रकाश टाकला.

एनडीएच्या १५० व्या तुकडीच्या ऐतिहासिक प्रशिक्षणामधून आज ३५३ कॅडेट्स उत्तीर्ण होऊन बाहेर पडले आहेत, ज्यामध्ये १८ महिला कॅडेट्सचा समावेश आहे. हा क्षण अकादमी आणि देशासाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे सांगताना जनरल द्विवेदी म्हणाले की, महिलांचा संरक्षण दलातील वाढता सहभाग हा बदलत्या भारताच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. हे तरुण अधिकारी अशा काळात लष्करात प्रवेश करत आहेत, जिथे युद्धाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. पारंपारिक युद्धभूमीच्या पलीकडे जाऊन आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि सायबर क्षेत्रातील वर्चस्व महत्त्वाचे ठरणार असून, माहितीवर आधारित युद्ध  हे भविष्यातील मोठे आव्हान असेल.

अधिक वाचा  महिला सक्षमीकरणातील 'सुदर्शन'चा पुढाकार कौतुकास्पद-अदिती तटकरे

लष्कर ‘ऑपरेशन सिंधूर २.०’ साठी सज्ज

लष्करप्रमुखांनी आपल्या भाषणात ‘ऑपरेशन सिंदुर’चा विशेष उल्लेख केला. या ऑपरेशनने भारताची अचूक आणि सडेतोड उत्तर देण्याची क्षमता जगाला सिद्ध करून दाखवली आहे. सध्या लष्कर ‘ऑपरेशन सिंधूर २.०’ साठी सज्ज होत असून, यामध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांमधील समन्वय वाढवण्यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. भारतीय लष्कर सध्या ‘परिवर्तनाच्या दशकातून’  जात आहे. या अंतर्गत लष्कराने स्वतःच्या संसाधनांमधून ड्रोन बटालियन, ‘व्यासरा’ बॅटरी, ‘शक्तिमान’ रेजिमेंट आणि तंत्रज्ञानाने सज्ज अशा नवीन तुकड्यांची निर्मिती केली आहे. माहिती आणि डेटा  हे आता सामरिक संसाधन बनले असून, त्या आधारे निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक वेगवान, स्मार्ट आणि लवचिक केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  मोदींनी शरद पवारांना कोणतीही ऑफर दिली नाही तर सल्ला दिला- देवेंद्र फडणवीस

अनेक आघाड्यांवरून हल्ले होतात, तेव्हा निर्णय घेण्यासाठी एआय अत्यंत उपयुक्त

आधुनिक युद्धभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय)  भूमिकेवर बोलताना जनरल द्विवेदी यांनी स्पष्ट केले की, जेव्हा शत्रूच्या हालचाली अत्यंत वेगवान असतात आणि एकाच वेळी अनेक आघाड्यांवरून हल्ले होतात, तेव्हा निर्णय घेण्यासाठी एआय अत्यंत उपयुक्त ठरते. ‘ओओडीए’ ( निरीक्षण, आकलन, निर्णय, आणि कृती) चक्राचा वेग वाढवण्यासाठी आणि शत्रूची अचूक ओळख पटवण्यासाठी लष्कर अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि भाषिक मॉडेल्सचा  वापर करत आहे. यामुळे शत्रूवर होणारे हल्ले अधिक अचूक होतील आणि कमीत कमी दारुगोळ्यात शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान करणे शक्य होईल. अचूकता आणि शत्रूचा विनाश  यांचा मेळ घालणे हेच आधुनिक युद्धतंत्राचे मुख्य उद्दिष्ट आहे.

थिएटर कमांड’ची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात

लष्कराच्या तिन्ही दलांना एकाच छताखाली आणण्यासाठी ‘थिएटर कमांड’ची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या संदर्भातील सविस्तर अहवाल संरक्षण मंत्र्यांना सादर करण्यात आला असून, त्यावर सध्या विविध स्तरांवर विचारमंथन सुरू आहे. तिन्ही सैन्य प्रमुखांनी यावर एकमत दर्शवले असून, येत्या २ ते ३ वर्षांत ही व्यवस्था प्रत्यक्ष जमिनीवर कार्यरत दिसेल, अशी आशा जनरल द्विवेदी यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘जय अनुसंधान’ मंत्राचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, भारतीय लष्कर उद्योग क्षेत्र, स्टार्टअप्स आणि शैक्षणिक संस्थांच्या मदतीने स्वदेशी बनावटीच्या कल्पनांचे रूपांतर प्रत्यक्ष युद्धक्षमतेत करत आहे.

अधिक वाचा  NDA Passing Out Parade: एनडीएच्या १५० व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा; १८ महिला कॅडेट्सचे ऐतिहासिक 'अंतिम पाऊल'

लष्कराचे काम केवळ युद्ध लढणे नसून राष्ट्र उभारणीतही त्यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. सीमा सुरक्षा, आपत्ती निवारण, दुर्गम भागातील विकास आणि ४३ ‘आर्मी गुडविल स्कूल’च्या माध्यमातून लष्कर देशातील तरुणांशी आणि नागरिकांशी जोडले गेले आहे असे त्यांनी नमूद केले.

उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सचे अभिनंदन करताना ते म्हणाले की, हे तरुण अधिकारी अशा भविष्यात पाऊल ठेवत आहेत जिथे धैर्य आणि चारित्र्यासोबतच तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय बांधिलकी लष्करी नेतृत्वाची व्याख्या ठरेल. एक प्रबळ सैन्य देशाला आत्मविश्वास देते आणि एकजूट असलेला देश सैन्याला बळ देतो, अशा शब्दांत त्यांनी आपला विश्वास व्यक्त केला.

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love