पुणे विधान परिषद: अजित पवार गटात उमेदवारीवरून मोठे राजकीय नाट्य; विक्रम काकडेंना उमेदवारी, सुनील टिंगरेंचाही अर्ज

पुणे विधान परिषद राष्ट्रवादी उमेदवारी नाट्य
पुणे विधान परिषद राष्ट्रवादी उमेदवारी नाट्य

पुणे(प्रतिनिधी)–पुणे विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये उमेदवारीवरून मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाने अधिकृतरीत्या विक्रम संजय काकडे यांचे नाव जाहीर केले असले, तरी माजी आमदार सुनील टिंगरे यांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एक जागा आणि दोन उमेदवार, अशा विचित्र परिस्थितीमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसत आहे.

पुणे विधान परिषदेसाठी मागच्या काही दिवसांपासून माजी आमदार विलास लांडे, सुनील टिंगरे, दीपक मानकर, योगेश बहल व विक्रम काकडे अशी नावे चर्चेत होती. या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच पुण्यातील अजित पवार यांच्या ‘जिजाई’ बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग आला होता. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या उपस्थितीत मॅरेथॉन बैठका पार पडल्या. याच ठिकाणी भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांचा राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश घडवण्यात आला. मात्र, अचानक विक्रम काकडे यांचे नाव पुढे आल्याने पक्षात नाराजीचे सूर उमटले.

विक्रम काकडेंची उमेदवारी आणि ’मैत्री’ची चर्चा

विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळण्यामागे पार्थ पवार यांच्याशी त्यांची असलेली घनिष्ठ मैत्री हे प्रमुख कारण असल्याचे बोलले जाते. या निवडीवरून पक्षात मोठी धुसफूस पाहायला मिळत असून, केवळ ‘धनाढ्या’ उमेदवार आणि ‘मित्रप्रेम’ या निकषावर निष्ठावंतांना डावलले गेल्याचा आरोप काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. संजय काकडे यांनी 2017 मध्ये राष्ट्रवादी फोडून भाजपला मदत केली होती, अशा नेत्याच्या मुलाला थेट उमेदवारी कशी दिली जाते, असा सवाल केला जात आहे.

अधिक वाचा  Pune Municipal Corporation Election : पुण्यात भाजपने खातं उघडलं : भाजपच्या मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप बिनविरोध विजयी

सुनील टिंगरे यांची बंडखोरी की डमी उमेदवार?

दुसरीकडे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुनील टिंगरे यांनीदेखील आपला अर्ज भरल्याने पेच वाढला आहे. काही सूत्रांनुसार, टिंगरे यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधत बंडखोरी केली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आणि संजय काकडे यांनी तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी किंवा अर्ज बाद होऊ नये म्हणून ‘सुरक्षेचा भाग’ म्हणून टिंगरे यांनी अर्ज भरण्याकडे लक्ष वेधले आहे. खुद्द टिंगरे यांनी मात्र आपण प्रबळ दावेदार असून पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील, असे सांगत आपली नाराजी कायम ठेवली आहे.

निष्ठावंतांची नाराजी आणि राजीनामा सत्र

विक्रम काकडे यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी राबणाऱ्या सुरेश घुले, दीपक मानकर आणि विलास लांडे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना डावलल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी थेट आपल्या पदाचे राजीनामे दिले असून पैसा जिंकला आणि कार्यकर्ता हरला, अशी टीका केली आहे.

अधिक वाचा  Congress and Shiv Sena UBT alliance for Pune Municipal Election : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची युती

विक्रम काकडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार

महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला सुटली असून विक्रम काकडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे संजय काकडे यांनी जाहीर केले आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि इतर महायुतीचे नेते या वेळी उपस्थित होते. दरम्यान, ऐनवेळी पक्षात संभ्रम निर्माण होऊ नये आणि काही तांत्रिक अडचण आल्यास पर्यायी उमेदवारी असावी, यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेवरून सुनील टिंगरे यांना ‘डमी’ अर्ज भरण्यास सांगण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

अनेकांची नाराजी

विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी डावलल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे नाराज झाले आहेत. आर्थिक निकष पाहून विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्याचा आरोप लांडे यांनी केला, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या नवख्या आहेत. अजितदादा गेल्याची जखम मोठी होती. आता संधी डावल्याची जखम झाली असल्याचे सांगून बहल यांनी नाराजी बोलून दाखविली.

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शहरातील पदाधिकाऱ्याला विधानपरिषदेवर संधी देण्याची मागणी स्थानिकांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांच्याकडे केली होती. माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, नगरसेवक नाना काटे, संदीप वाघेरे विधानपरिषद उमेदवारीसाठी इच्छुक होते. परंतु, पिंपरीऐवजी पुण्यातील उमेदवार देण्यात आला. त्यामुळे इच्छुकांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखविली.

अधिक वाचा  माजी खासदार संजय काकडे यांना अटक केल्याची अफवा

शहराध्यक्ष बहल म्हणाले, ’दिवंगत अजित पवार यांच्याबरोबर 34 वर्षांपासून एकनिष्ठपणे काम केले. पिंपरी मतदारसंघ राखीव असल्याने विधनसभा निवडणूक लढविता आली नाही. सर्व वस्तुस्थिती पक्षश्रेष्टींना सांगितली होती. वरिष्ठ असल्याने माझी दावेदारी प्रबळ होती. शंभर टक्के उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, मोठा भ्रमनिरास झाला असून तीव्र नाराज आहे. आता काही निर्णय घेणे चुकीचे होईल. सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्या निर्णयाबरोबर राहणार आहे. पक्षश्रेष्टींच्या वेगळ्या अडचणी असू शकतात’.

पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांची नाळ तुटायला लागली

विलास लांडे म्हणाले, पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांची नाळ तुटायला लागली आहे. अजितदादांच्या निधनामुळे आम्ही हतबल असून आमच्या पाठीमागे कोण राहिले नाही. प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळायला पाहिजे होती. विक्रम काकडे कोणत्या खाणीतील हिरा आहे, हे माहिती नसून पक्षाने शोधून काढला आहे. आर्थिकदृष्ट्या ताकदवान असल्याने त्यांना उमेदवारी दिली आहे’.

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love