मुंबई- एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना कृषी खाते देण्यात येणार असल्याची चर्चा सुरुवातीला होती. त्यानंतर त्यांना कृषी-किंवा गृहनिर्माण खाते देण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, कृषी खाते शिवसेना सोडण्यास राजी नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गृहनिर्माण खात्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचीही नाराजी खडसे यांच्या प्रवेशादरम्यान लपून राहिली नाही. त्यांची समजूत काढता-काढता खडसे यांच्या प्रवेशाला दोनचे चार वाजले. शेवटी शरद पवार यांनी या सगळ्या गोष्टींवर पडदा टाकत मंत्रिमंडळात बदल केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, नाथाभाऊ राष्ट्रवादीत आल्याने आता पक्षाला गती येईल, नाथाभाऊ काय चीज आहे तुम्हाला दाखवून देऊ, असा सूचक इशारा दिला.
नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता संपूर्ण खान्देश राष्ट्रवादीमय होईल, यात मला शंका नाही. एकदा शब्द दिला म्हणजे त्यावरून नाथाभाऊ मागे हटत नाहीत, असे कौतुक करत शरद पवार यांनी नाथाभाऊ राष्ट्रवादीत आल्याने आता पक्षाला गती येईल. नाथाभाऊंनी खान्देशात पक्ष वाढवण्याचा शब्द दिला आहे. ते जेव्हा शब्द देतात तेव्हा तो पूर्ण करतात. त्यावरून मागे हटत नाहीत. ही त्यांची खासियत असल्याचे शरद पवार म्हणाले. आता कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावर आपण जळगावात जाणार असून शक्तिप्रदर्शन करून नाथाभाऊ काय चीज आहे हे दाखवून देणार आहोत, असंही ते म्हणाले. त्यामुळे एकनाथ खडसे यांना सध्यातरी मंत्रिपद मिळणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
















