मुंबई- एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसे आता अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि एकनाथ यांच्यातील कलगीतुरा आता रंगू लागल आहे. नाथा भाऊंना लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात हे पाहावे लागेल, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत व्यक्त केल्यानंतर खडसे यांनी ‘तुम्ही तर कुल्फी आणि चॉकलेट मिळावं म्हणून भाजपमध्ये आलात’ अशी खोचक टीका पाटलांवर केली आहे.
नाथा भाऊंना नेमकं काय द्यायचं हे अजून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठरलेलं नाहीये. तुमचे समाधान होईल असे देऊ असं त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर नाथाभाऊ नरिमन पॉईंट मधल्या फ्लॅटवरून बळेबळे बाहेर पडले. समाधान होण्यासाठी लिमलेटची गोळी ही देतात आणि कॅडबरीही देतात. जे काही मिळेल त्यामुळे नाथाभाऊ समाधानी होतील का? की काही पर्यायच उरलेला नाही म्हणून जे मिळेल ते स्वीकारतील? असाही टोला प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. नाथाभाऊ समाधानी होतात की नाही, हे येणारा काळ ठरवेल असे पाटील म्हणाले.
दरम्यान, खडसे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. भाजपनं मला काहीही फुकट दिलेलं नाही. त्यासाठी मी माझं 40 वर्षाचं आयुष्य भाजपला दिलं आहे. मला फुकट मिळालं नाही. मनगटाच्या जोरावर मिळवलं आहे. चंद्रकांतदादांचा भाजपशी संबंध तरी काय होता? तुम्ही विद्यार्थी परिषदेत होता. काही तरी कुल्फी किंवा चॉकलेट मिळावं म्हणून तुम्ही भाजपमध्ये आला. तुम्हाला सर्व फुकट मिळालं, अशी टीका करतानाच कोल्हापुरात आमदार, खासदार तर सोडा साधा पंचायत समितीचा सदस्य तरी तुम्हाला निवडून आणता येतो का? असा सवालही त्यांनी केला.