दिल्लीत बसून बोलण्यापेक्षा जावडेकरांनी पुणेकरांना मदत करावी – मोहन जोशी


पुणे -केंद्र सरकारमध्ये प्रकाश जावडेकर वजनदार मंत्री आहेत. त्यांनी पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी भरघोस मदत मिळवून द्यायला हवी होती, ते कर्तव्य न बजावता राज्य सरकारचा राजीनामा मागताहेत. हे ढोंगी राजकारण आहे, अशी टीका माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.
पुण्यात साथीचा जोर अधिक आहे. त्यामुळे पुणेकरांचा साथीच्या तडाख्यापासून बचाव करणे, कोविडग्रस्तांचे जीव वाचविणे गरजेचे आहे. गंभीर परिस्थितीचे भान ठेवून भाजपच्या नेत्यांनी आपल्या मागण्या रस्त्यावर गर्दी जमविणारी आंदोलने न करता वेगळ्या मार्गाने मांडायला हव्या. मात्र, राज्य सरकारची कोंडी करण्यासाठी भाजप नेते संकटाच्या परिस्थितीमध्ये राजकारण करत आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर पुण्याचे रहिवासी आहेत. पुण्यात भाजपचे खासदार, चार आमदार, शंभर नगरसेवक आहेत. यांच्या मार्फत पुण्यात यापूर्वीच आरोग्य यंत्रणा सुसज्ज व्हायला हवी होती. केंद्र सरकारमार्फत ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर अशा सुविधा पुरवायला हव्या होत्या.

अधिक वाचा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं तरच मराठ्यांना आरक्षण मिळेल

देशाचा विचार केला तर कोविड साथीचे थैमान पुण्यात सर्वाधिक आहे, याचे गांभीर्य ओळखून केंद्राकडून अधिकाधिक पुरवठा होईल याची दक्षता जावडेकर यांनी घ्यायला हवी होती. हे न करता राज्य सरकारच्या राजीनाम्याची मागणी जावडेकर करत आहे. यामागे कुटील डाव आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.त्यांनी दिल्लीत बसून बोलण्यापेक्षा पुणेकरांना मदत करावी, अशीही मागणी जोशी यांनी केली आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love