पंढरीची अक्षर वारी: पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-5)

अध्यात्म महाराष्ट्र
Spread the love

वारकरी संप्रदायातील आचारधर्म हा तात्विक धारणेतून निर्माण झालेल्या नीतिशास्त्रातून स्वाभाविकपणे आकारास आला आहे, म्हणूनच या आचारधर्मात कोठेही कर्मकांड निर्माण झाल्याचे आपल्याला दिसत नाही, या संप्रदायातील भगवद्भक्तांच्या आचरणाचा विचार केला तर असे लक्षात येते, की सर्वच संतांनी विठ्ठल हेच हरी आणि हर यांचे ऐक्य प्रतीक असल्याचा जो संस्कार केला आहे, त्यामुळे या संप्रदायामध्ये भेद दूर होऊन समत्वदृष्टी निर्माण झाली आहे. एकदा का ही समत्व दृष्टी निर्माण झाली, की मग आपोआपच प्रेम, बंधुता या गोष्टी सहजपणे आचरणात यायला लागतात.

 प्रा.र.रा.गोसावी आपल्या संशोधनपर ग्रंथात याच पद्धतीचे मत व्यक्त करतात, *विश्वबंधुत्व समत्व आणि प्रीती या तीन तत्त्वातून वारकर्‍यांचा आचारधर्म  उदयास आला आहे. वारकरी संप्रदायातील आचार धर्म हा कर्मकांड जरी नसला तरी सहज करण्यायोगे, आचरण्याजोग्या काही गोष्टी मात्र या संप्रदायात निश्चित आहेत. रामकृष्णहरी हा मंत्र जप, गळ्यात तुळशीची माळ धारण करणे, कपाळ व शरीराच्या इतर भागावर गोपीचंदाचा वापर करून मुद्रा धारण करणे, एकादशी दिवशी उपवास करणे व पंढरपूर – आळंदीची वारी करणे अशा गोष्टी वारकरी म्हणवणाऱ्याने कराव्यात अशी अपेक्षा ठेवली गेली आहे, यासाठी आग्रह धरला जातो परंतु सक्ती केली जात नाही, त्यामुळेच हा आचारधर्म कर्मकांड ठरत नाही.

गेली हजार-बाराशे वर्षे ज्या संप्रदायाच्या वाढीचा कायमच चढता आलेख राहिलेला आहे, त्या संप्रदायाच्या या वाढीमागील मुख्य कारण कोणते असेल, तर ते म्हणजे या संप्रदायाची शिकवण. संत ज्ञानेश्वर – नामदेवांपासून संत तुकाराम – निळोबारायांपर्यंत सर्वच संतांनी आपल्या आचरणातून, अभंग- भजन -कीर्तन यातून कर्तव्य करा पण ईश्वरावर श्रद्धा ठेवा, ईश्वरालाच आपली बुद्धी अर्पण करा, प्रपंच करा पण त्याचा मोह ठेवून त्याला कायम चिटकून राहू नका, वर्णधर्म पाळा पण भेदाचा भाव मनामध्ये न ठेवता वर्णाभिमान सोडा यासारखी सातत्याने शिकवण दिली. सर्वच संतांनी आपल्या वाड्मयातून या गोष्टींचा प्रसार करून वारकरी संप्रदायाला वर्धिष्णू बनविले. संतांनी आपल्या वागण्यातून, साहित्यातून समाजाचे प्रबोधन करायचे व अध्यात्मिक, वैचारिक व सामाजिक जाणिवा जागृत, विकसित करायच्या हेच ध्येय ठेवलेले होते, म्हणूनच या संत साहित्याची आजच्या आधुनिक काळातही तेवढीच गरज असल्याचे लक्षात येते.

(क्रमशः)

-डॉ. सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

मो.क्र. ७५८८२१६५२६

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *