पंढरीची अक्षर वारी: पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-2)

अध्यात्म महाराष्ट्र
Spread the love

प्राचीनतम अशा हिंदू धर्मामध्ये मोक्षप्राप्तीला फार महत्त्व. जन्मजन्मांतरीच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी पुण्यसंचय करणे, व्रत-वैकल्ये करणे, यज्ञ – याग करणे, परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वेद – उपनिषदांचे अध्ययन करणे या साऱ्या गोष्टी कराव्या लागत. पण प्रत्यक्षात वर्णाश्रम व्यवस्थेतील पहिल्या तीन वर्णातील पुरुषांनाच वेद-उपनिषदातील वचनांच्या अध्ययन- श्रवणाचा अधिकार. राहिलेल्या वर्णातील व्यक्ती व महिलांना मग मुक्ती मिळणार कशी? ज्यांना हे सारे करण्याचा अधिकार आहे, त्यांच्यासाठी मोक्षप्राप्तीचा मार्गही किती खडतर? या खडतर मार्गाने जाणे अनेकांना शक्य नव्हते, कोणी या मार्गाचा अवलंब करायचे ठरवून निघालाच तर त्याच्या समोरील अडचणी तर अगणित. एखादी व्यक्ती वेद शिकू लागली, शिकताना मंत्र म्हणताना एका स्वराची अगर अक्षराची म्हणण्यात चूक झाली तर भलताच अनर्थ होतो व अशा चुकीच्या पद्धतीने वेद म्हणणाऱ्याचाच नाश होतो असे मानले जाई, अशा थोर अडचणीत सापडण्यापेक्षा या मार्गाने न गेलेलेच बरे अशी भावना बळावू लागते. पण प्रत्यक्षात या मोक्षाकडे जाणारा याहून सोपा मार्ग कोणता? यावर विचार होऊन याचा शोध घेतला जाऊ लागला व यातूनच पुढे आला, सर्वांसाठी अतिशय सहज – सोपा असा वारकरी संप्रदायाचा भक्तीमार्ग.

॥पै भक्ती एकी मी जाणेI तेथ साने थोर न म्हणेll

IIआम्ही भावाचे पाहुणे I भलतेयाll

संत श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात म्हणतात त्याप्रमाणे भगवंत हा भक्ताचा फक्त भक्ती व जिव्हाळा जाणतो. त्याला भक्ताकडून कोणत्याही व्रत-वैकल्ये, यज्ञ-याग अथवा नवस-सायासाची अपेक्षा नसते. भगवंत म्हणतो, माझा भक्त जातीने- वर्णाने कोणीही असो, तो लहान असो की मोठा, तो प्रतिष्ठित असो की सामान्य, तो ज्ञानी असो की अज्ञानी, तो पापभीरू असो की पापी, तो कसाही असो पण त्याची माझ्यावरील भक्ती अढळ असेल तर तो मला प्रिय आहे. एकविध भाव असला तर देव सर्वांना समान लेखतो, त्यांच्यात उच्च-नीच असा भेद करत नाही. याप्रमाणे परमेश्वर जर भक्ताच्या निरपेक्ष भक्तीला भुलून जर मोक्षाचे द्वार उघडून देत असेल तर याहून मोठा, श्रेष्ठ, सहज व सुलभ असा मुक्तीचा मार्ग कोणता असू शकेल? म्हणूनच इतर कोणत्याही अध्यात्मिक मार्गापेक्षा भक्तिमार्गाकडे सहाजिकच लोकांचा ओढा वाढू लागला. विशेषतः महाराष्ट्र राज्यात तरी या भक्तिमार्गाचा प्रसार आणि प्रचार करण्यात वारकरी संप्रदाय म्हणजेच भागवत संप्रदाय सर्वात पुढे होता.

 (क्रमशः)

-डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

 मो. क्र. ७५८८२१६५२६.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *