पंढरीची अक्षर वारी: पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-3)

अध्यात्म महाराष्ट्र
Spread the love

वारकरी संप्रदाय हा केवळ महाराष्ट्र राज्यापुरता पूर्वीही कधी मर्यादित नव्हता व आजही नाही. या संप्रदायाबद्दल संत साहित्यातील संशोधकांनी तसेच निरनिराळ्या इतिहासकारांनी निरनिराळी मते व्यक्त केली आहेत, परंतु या सर्वांनीच या संप्रदायाचे व संप्रदायाच्या माध्यमातून घडलेल्या कार्याचे महत्त्व मान्य केले आहे. वारकरी संप्रदायाचे अभ्यासक श्री. शं. दा.पेंडसे आपल्या एका ग्रंथांमध्ये संप्रदायाची व्याख्या करताना म्हणतात,वारकरी संप्रदाय म्हणजेच महाराष्ट्रीय संतांचा भागवत धर्म. हा भागवतधर्म विशाल आणि समावेशक अशा वैदिक धर्माचेच एक विकसित रूप आहे. वेदातील भग-सविता – सूर्य – विष्णू या देवता क्रमाच्या विकासातून विष्णू हे Iविष्णुदैवानां श्रेष्ठ : इति I य : स: विष्णुसार्य स: I असे विशाल स्वरूप उदयास आले. भगवान विष्णू हा यज्ञ आहे. या विष्णरुपी यज्ञात चातुर्वर्ण्ययुक्त विराट पुरुषाचे हवन करण्याच्या प्रेरणेतून धर्मकल्पना उद्यास आली. या धर्मकल्पनेसच आपण वैष्णवधर्म असे म्हटले. यज्ञाच्या बाह्य अवडंबरापेक्षा त्यातील त्यागाच्या तत्वावर सर्वस्व भर देऊन उद्यास आलेला हा वैष्णवधर्म म्हणजे सनातन भागवतधर्म होय.* वारकरी संप्रदायाची ही व्याख्या किती यथार्थ आहे.

वारकरी संप्रदायाचे महत्त्व अनेक अभ्यासकांनी व संशोधकांनी मान्य केले आहे. संत साहित्याचे गाढे अभ्यासक श्री. भा.पं. बहिरट आपल्या ग्रंथात म्हणतात, *वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्मामध्ये असलेल्या भारतातील अनेक भक्ती संप्रदायांपैकी प्रमुख असा संप्रदाय आहे, हा संप्रदाय सद्धर्म आणि सदाचार यांच्या शिकवणुकीचा द्वारा तो श्रेष्ठ जीवनमूल्यांचे रक्षण व पोषण करीत आहे.* सद्धर्म व सदाचार यासाठी सातत्याने सर्वच संतांनी या संप्रदायाच्या माध्यमातून केलेले कार्य विचारात घेता श्री.बहिरट यांचे म्हणणे पटू लागते. वारकरी संप्रदाय अथवा पंथ हे नाव कसे पडले या संदर्भात प्रा.शं. वा. दांडेकर आपल्या पुस्तकात पुढीलप्रमाणे आपले मत मांडतात, वर्षातून आषाढी, कार्तिकी, माघी अथवा चैत्री यापैकी एका शुद्ध एकादशीस गळ्यात तुळशीची माळ घालून नियमाने जो पंढरपुरास जातो, तो पंढरपूरचा वारकरी म्हटला जातो व त्याच्या उपासनेचा जो मार्ग तो वारकरी पंथ होय.* परंतु वारकरी म्हणजे काय? हा प्रश्न उरतोच. कै. वि.का. राजवाडे आपल्या *नामादिशब्दव्युत्पत्तीकोश* यामध्ये *वारि: -री (प्रवाशांची टोळी) = वारी* असे म्हटले आहे. यावरून पंढरपूरला जाणारी प्रवाशांची टोळी म्हणजेच भगवद्भक्तांचा समूह म्हणजे वारी व अशी वारी नियमाने करणारे ते वारकरी व या भगवद्भक्तांचा म्हणजेच वारकऱ्यांचा पंथ म्हणजे वारकरी पंथ अथवा संप्रदाय असे म्हणता येईल.

(क्रमशः)

-डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

 मो.क्र. ७५८८२१६५२६

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *