पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-७)

अध्यात्म महाराष्ट्र
Spread the love

आळंदी, देहू व इतर स्थानावरून पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांबाबत आज मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसते, आषाढीच्या यात्रेमध्ये सामील होण्यासाठी गावोगावच्या पालख्या पंढरीच्या वाटेने चालताना दिसतात  व संपूर्ण महाराष्ट्रात भक्ती चैतन्य संचारते. परंतु आळंदी व देहू येथून निघणारा दिंडी सोहळा हा कधीपासून सुरू झाला याबाबत मात्र अभ्यासकांमध्ये मतमतांतरे दिसून येतात. संत नामदेव महाराज विठ्ठलाच्या आरतीमध्ये आषाढी कार्तिकी भक्तजन येतीl  असे म्हणतात, मग याचा अर्थ संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांच्या आधीपासून आषाढी आणि कार्तिकीची वारी भरत होती व या वाऱ्यांना निरनिराळ्या स्थानातून पालख्या येत होत्या की केवळ या दोन वाऱ्यांना पंढरपुरात लोक पंढरीरायाला भेटायला येत असत हे मात्र निश्चित सांगता येत नाही. तरीही संशोधनाअंती पुढे आळंदी व देहूहून निघणाऱ्या पालख्यांचा इतिहास वेगळ्या पद्धतीने सांगितला जातो.

 संत तुकोबारायांच्या देहूवरून पालखी सोहळा ज्या काळात निघत होता, त्याकाळात आळंदीहून पालखी सोहळा निघत होता की नाही याबाबत शंका व्यक्त केली जाते. श्री तुकाराम महाराजांचे मूळ पुरुष श्री विश्वंभरबुवा हे श्री ज्ञानदेवांच्या समाधीच्या सुमारास आठ ते दहा वर्षांचे होते, त्यांनी पंढरीची वारी चालू ठेवली होती, पण वृद्धापकाळात त्यांनाही पंढरीस येणे जमेना म्हणून देहू गावी त्यांनी श्री विठ्ठल मंदिर उभारले. विश्वंभर यांचे पुत्र हरी व मुकुंद यांनी क्षात्रवृत्ती स्वीकारली व त्यामुळे वारीची परंपरा खंडित झाली, विश्वंभर यांचे पुत्र हरी व मुकुंद यांचा इस्लामी पराक्रमाच्या एका धामधुमीत अंत झाला, मुकुंदाची पत्नी सती गेली, हरीचा मुलगा विठ्ठल, विठ्ठलाचा मुलगा पदाजी, पदाजीचा मुलगा शंकर, शंकराचा मुलगा कान्होबा यांनी मात्र पंढरीची वारी सुरू ठेवली. म्हणजेच शके १२१८ते १५८० म्हणजेच सन१२९६ ते १६५८ या काळात श्री क्षेत्र देहूहून पंढरीला वारकरी येत असत पण या काळात श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीहून पंढरीला दिंडी जात होती का? किंवा लोक स्वतंत्रपणे जात होते का? किंवा जात असले तरी श्री ज्ञानदेवांच्या पादुका वगैरे बरोबर नेत होते का? याबाबत मात्र शंका व्यक्त केली जाते. कारण याच दरम्यान म्हणजेच शके १५१६ म्हणजेच सन १५९४ मध्ये श्री एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली व ज्ञानेश्वरांच्या समाधीस्थानाचा शोध लावला, याचाच अर्थ संत ज्ञानेश्वरांचे  समाधीस्थान हे दुर्लक्षित होते, त्यामुळे तेथून पंढरीच्या वारीला पालखी निघत नसावी असे लक्षात येते.

(क्रमशः)

डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

 मो.क्र. ७५८८२१६५२६

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *