आषाढस्य प्रथमदिवसे ….

महाराष्ट्र लेख
Spread the love

दैवी देणगी काय असते?? याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कविकुलगुरू कालिदास होय.प्राचीन काळात भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या लेखन रुपी फुलांचा सुगंध त्यांनी पसरवला होता. स्वतःच्या आयुष्याबद्दल कुठेही लिखाण त्यांचे दिसून येत नाही, पण त्यांनी साकारलेली कल्पना सृष्टी साऱ्यांनाच मोहून टाकते ,इतकं प्रेम त्यांचं त्यांच्या कलेवर होतं .मेघदूत या त्यांच्या अद्वितीय कलाकृतीतील निसर्गाचं अत्यंत मोहक वर्णन आपल्या मनाला भावतं. निसर्गाचे मानवीकरण करून एका मेघाला म्हणजेच ढगाला आपला दूत म्हणून पत्नीकडे पाठविले .त्या मेघाला आपल्या मनाची अवस्था उलगडून सांगितली, जणू काही जवळच्या एखाद्या मित्राला आपले भाव वर्णावेत..

कमार्ता हि प्रकृतिकृपणा: चेतनाचेतनेषु”

मेघदूत म्हणजे यक्ष आणि त्याची पत्नी यांचा विरहाने निर्माण झालेल्या भावनांची कथा .त्या भावना घेऊन मेघ यक्ष पत्नीकडे निघालेला आहे त्याचा तो प्रवास आपणही अनुभवतो. तेव्हा वरील श्लोकपङ्ति मधून सांगतात,

प्रेमा मध्ये माणसाची अवस्था सजीव निर्जीव हा फरकही ओळखू शकत नाही”

आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशीच रामगिरी पर्वतावर राहणाऱ्या कशाला हा सुंदर मेघ दिसला.

वप्र क्रीडा परिणत गज प्रेक्षणीयम्”

अर्थात दरडीला टक्कर देणाऱ्या हत्तीप्रमाणे मोहक असा तो मेघ वाटला. ही मेघा ला दिलेली उपमा पाहून ,

उपमा कालिदासस्य’

या उक्तीचे साक्षात दर्शन घडून येते. आणि इथूनच खरं मेघदूत हे खंडकाव्य बाळसे धरू लागते म्हणूनच

‘आषाढस्य प्रथम दिवसे’ ही उक्ती ती जगाच्या मनावर अधिराज्य करते. पती-पत्नीचा विरह, पत्नीबद्दल असलेलं गाढ प्रेम आणि ते मेघा जवळ व्यक्त होण , हे सारं काही अलौकिकच आहे.

एकूण सात कलाकृती मेघदूत आणि ऋतुसंहार ही दोन खंडकाव्य, रघुवंश आणि कुमरसंभव हे दोन महाकाव्य,तीन नाटकं ह्या त्यांनी केल्या तर सर्वच्या सर्व अजरामर ठरल्या, सुवर्ण अक्षरांनी कोरल्या गेल्या.

मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय आणि अभिज्ञान शकुंतल ही तीन नाटकं अजूनही रंगमंचावर उभी राहिल्यास प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहात नाहीत. त्यातही म्हणले जाते…….

काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला’

एवढी प्रचंड प्रतिभा असूनही, दीपशिखा कालिदास, कविकुलगुरू कालिदास , कविता कामिनीचा कालिदास, इतक्या उपाध्या मिळालेल्या असूनही प्रचंड बुद्धिमत्तेच्या या कालिदासाने प्रेक्षकांचा कौल महत्त्वाचा मानला शाकुंतल या नाटकाच्या यशासाठी त्यांनी जे विचार व्यक्त केले त्यातून हे स्पष्ट होते. जसे की,

आ परितोषात् विदुषाम्’

म्हणजे विद्वान प्रेक्षकांकडून समाधानाची पावती मिळेपर्यंत नाट्य प्रयोगाबद्दल खात्री बाळगू नये.

यातूनच त्यांची स्थितप्रज्ञ, विनम्र वृत्ती दिसून येते.

या नाटकांमध्ये आश्रमातील वर्णन असल्याने निसर्गाशी सर्व प्राणी ,पक्षी, झाडे ,वेली यांच्याशी अतूट नाते असल्याचे पदोपदी दिसून येते, बघा कसे ते….

पातुं न प्रथमं व्यवस्यति जलं युष्मास्वपितेषु या’

तिथल्या वेली- वृक्षांना पाणी घातल्याशिवाय कधी ती शकुंतला स्वतः पाणी देखील प्याली नाही.

अशी अतिशय नाजूक व मोहक सौंदर्यवती शकुंतला खूप हळवी आणि लाघवी होती.

दुर्वास मुनींच्या शापामुळे पडलेल्या प्रेमाचा विसर वअंगठीचे रहस्य यामुळे नाटकात उत्सुकता निर्माण झाल्याने तिथे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य बळावते. हे एक अलौकिक कर्याच नव्हे का??

खरे तर, अशा या अजरामर कलाकृतींवर चर्चा करणं खूप मोठं धनुष्य पेरण्या प्रत आहे . याठिकाणी कालिदास दिनानिमित्त मला सर्वांना सांगावसं वाटतं त्या कलाकृतींच्या सौंदर्याचा अनुभव प्रत्येकाने स्वतःचा स्वतः नक्कीच घ्यावा आणि मन तृप्त करावे…..

आयुष्य ते जगावे….

तृप्त होऊनी साठवावे…….

सौ.रूपाली जोशी -केसकर

(माध्यमिकशिक्षिका संस्कृत ,मॉडर्न हायस्कूल,पुणे)

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *