पुणे-“देवेंद्र फडणवीस यांना नेते मानून त्यांनी निवडणूक लढवली आणि मुख्यमंत्रीपदासाठी विरोधी विचारसणीच्या लोकांचे तळवे चाटले,” असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेणाऱ्या ‘मोदी @ 20’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचं प्रकाशन अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. पुण्यात आयोजित प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळें आदी उपस्थित होते.
शाह म्हणाले, “कालच निवडणूक आयोगाने दूध का दूध पानी का पानी केलं आहे. कालच सत्यमेव जयतेचं सूत्र अधोरेखित झालं. “शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण खऱ्या शिवसेनेला मिळालं याबद्दल त्यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करा,” असंही शाह म्हणाले. “देवेंद्र फडणवीस यांना नेते मानून त्यांनी निवडणूक लढवली आणि मुख्यमंत्रीपदासाठी विरोधी विचारसणीच्या लोकांचे तळवे चाटले,” असा टोला शाहांनी लगावला.
“माझ्याबरोबर हात उंच करुन मुठी आवळा आणि महाराष्ट्रातील सर्व लोकसभेच्या जागा जिंकण्याचा संकल्प करा. मोठ्याने बोला भारत माता की जय,” असं अमित शाह म्हणाले. अमित शाहांबरोबर इतरही उपस्थितांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. अमित शाहांनी आपल्या भाषणामध्ये मोदींच्या कार्याचा आढावा घेताना गुजरातमध्ये त्यांनी अनेक योजना सुरु केल्या. २४ तास लाईट, प्रत्येक घरात शौचालय यासारख्या योजना राबवणारं गुजरात हे पहिलं राज्य होतं असं सांगत अमित शाहांनी मोदींचं प्रशासन म्हणजे विकास असं सूचित करणारं विधान केलं. यानंतर अमित शाहांनी पूर्वीच्या सरकारमधील आणि आताच्या सरकारमधील धोरणांमध्ये कसा फरक आहे यासंदर्भातील आपली मतं मांडली.
२००४ ते २०१४ या कालावधीत देशात युपीएचं सरकार होतं. या कालावधीत जे सरकार होतं त्या सरकारमधले सगळे मंत्री स्वतःला पंतप्रधान समजत होते आणि पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंह यांना कुणीही पंतप्रधान समजत नव्हतं. दहशतवादी रोज आपल्यावर हल्ला करू लागले होते. लष्कराच्या जवानांना त्रास देत होते. विदेशातही आपल्या देशाचे पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंह यांना काही सन्मान नव्हता. २०१४ च्या निवडणुका लागल्या तेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. त्यावेळी मोदी लाट आली आणि संपूर्ण देशाने मोदींना निवडून दिलं. २०१४ मध्ये जेव्हा भाजपाचं सरकार आलं तेव्हापासून आजपर्यंत अनेक प्रकाराचं चांगलं परिवर्तन देशात झालं असंही अमित शाह म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राजकारणात येणं हा काही योगायोग नाही. त्यांची मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून जी कारकीर्द आहे तर त्याआधीचा त्यांचा ३० वर्षांचा त्याग आणि तपश्चर्या हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. मोदीजी आमचे प्रेरणास्रोत कसे झाले? त्यांनी काय काय केलं? कसा संघर्ष केला? गरीबातल्या गरीब घरांमध्ये भाजपा कशी पोहचवली हे सगळं आपल्याला समजून घेतलं पाहिजे असं अमित शाहम्हणाले.
नरेंद्र मोदी यांना जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री करण्यात आलं तेव्हा त्यांनी एकही निवडणूक लढवली नव्हती. त्यांच्या मनात किती प्रश्न असतील विचार करा. मात्र लोकांच्या समस्या सोडवण्याची कला त्यांच्याकडे आहे. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवले. भारतमातेची सेवा करणं हाच उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला होता असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. गुजरातचा विकास त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केला त्याचा मी साक्षीदार आहे. ग्रामीण विकासाचे अध्याय आधी गुजरातमध्येच लिहिले गेले. विविध प्रकारचा विकास केला गेला. दहशतवादाला उत्तर दिलं गेलं. त्यामुळे मोदीजी १३ वर्षात एक आदर्श ठरत गेले. २०१४ मध्ये जेव्हा हे ठरलं की मोदींच्या नेतृत्त्वात लोकसभा निवडणुका लढवायच्या आहेत तेव्हा संपूर्ण देश आनंदी झाला असंही अमित शाह म्हणाले.
मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा आपल्या कार्यातून देश प्रगती करु शकतो आणि संपूर्ण जगात पहिल्या क्रमांकावर जाऊ शकतो हे शक्य आहे हे मोदींनी दाखवून दिलं. हा काळ भारताच्या राजकीय इतिहासातला सुवर्ण काळ आहे. ७० वर्षे ज्या लोकांनी राज्य केलं त्यावेळी लोक त्रास आणि समस्यांना सामोरे जात होते. मात्र आज ती स्थिती नाही. गरीबांना घरं दिली गेली आहेत. गॅस दिला गेला आहे. मोदींच्या काळातच हे शक्य झालं आहे असंही अमित शाह यांनी नमूद केले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींच्या कार्याबद्दल भाष्य केलं. परदेशामध्येही मोदींची चर्चा असते असं शिंदे म्हणाले. डाव्होसला आपल्याला याची झलक पाहायला मिळाली, असंही शिंदे म्हणाले. यावेळेस शिंदेंनी ‘कालच एक चांगला निर्णय आला’ असं म्हणत निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल अमित शाहांसमोर उल्लेख केला. शिंदेंनी २०१९ च्या विधानसभा निवडणुका शिवसेना आणि भाजपाने एकत्रित लढल्या. मात्र नंतर सरकार कोणाबरोबर झालं हे आपण पाहिलं. आम्ही ती चूक सुधारली, असंही म्हटलं. भाषणाच्या सुरुवातील शिंदेंनी ‘भाजपा-शिवसेना युतीचा विजय असो,’ अशाही घोषणा दिल्या.
अमित शाह यांच्या ताफ्यात शिरली एक व्यक्ति
अमित शाह यांच्या ताफ्यात शिरलेल्या एका व्यक्तीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जवळचा असल्याचे सांगून ती व्यक्ती ताफ्यात शिरल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
या व्यक्तीला ‘आयबी’च्या टीमने हेरले आणि काही मिनिटांतच ताब्यात घेतले. सोमेश धुमाळ असे या संशयित व्यक्तिचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. सोमेश धुमाळने आपण मुख्यमंत्री आणि खासदार शिंदे यांच्याकडे जवळचे असल्याचे सांगून ताफ्यात प्रवेश केला.या व्यक्तीने प्रोटोकॅाल तोडल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.