तर आपल्याशिवाय इतर सर्वांची बोलती बंद होईल, कारण तुमचे सर्वच नेते जामीनावर बाहेर आहेत

राजकारण
Spread the love

पुणे–पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल कॉंग्रेसने २०० पेखा जास्त जागा मिळवत ममता दिदींनी हॅट्रीक साधली आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील मंत्री आणि भाजपने हे निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, भाजपने धोबीपछाड करूनही त्यांना पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यात यश मिळवता आलेले नाही. पश्चिम बंगालच्या या निवडणूक आणि निकालावरून महाराष्ट्रात मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि भाजपचे नेते यांच्यात राजकीय आखाडा सुरु झाला आहे. पश्चिम बंगालच्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री छगन भुजबळ यांनी ममता बॅनर्जी यांची उपमा देत पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संतापून, “ तुम्ही जामिनावर सुटलेला आहात, निर्दोष सुटलेला नाही, जास्त जोरात बोलू नका,अन्यथा फार महागात पडेल’, असे वक्तव्य केले होते. त्यावरून आता राजकीय रान पेटले आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्हिडीओ ट्वीट करून निशाना साधला आहे. या व्हिडीओमध्ये चाकणकर यांनी, “सध्या देशात आणि महाराष्ट्रात करोनामुळे अतिशय वाईट परिस्थिती उद्भवलेली आहे. मात्र आपल्याला याचं काही घेणं देणं नाहीय. त्यामुळे सातत्याने आपण याला महागात पडेल त्याला बघून घेऊ, याच्यावरती गुन्हा दाखल करा, त्याला आत टाका यावर आपण पीएचडी करता करता एमफील पण करायला लागले आहात. पण तुम्हाला एकच सांगायचं आहे, तुम्हाला तुमच्या गावची ग्रामपंचायत सुद्धा निवडून आणता आली नाही. कोल्हापूरमध्ये तुम्हाला तुमच्या विचारांचा महापौर बसवता आला नाही,” असा टोला लगावला आहे.

 चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर सोडून पुण्यात मतदारसंघ शोधावा लागल्याचा टोलाही चाकणकर यांनी लगावला आहे. “कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीच्या वेळी आपण केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे आपल्याला आपला मतदारसंघ सोडून आमच्या पुण्यातल्या एका महिलेचा सुरक्षित असा कोथरुड मतदारसंघ निवडावा लागला. या साऱ्याचा आपण शांतपणे विचार करावा असं मला वाटतं,” असं चाकणकर यांनी म्हटलं आहे.

तसेच सध्या महाविकास आघाडीने करोनासंदर्भातील कामांना प्राधान्य दिल्याने तुमच्या टीकेकडे कोणी लक्ष देत नसल्याचंही चाकणकर यांनी चंद्रकांत पाटलांना सांगितलं आहे. “जययुक्त शिवार घोटाळा, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा असे अनेक घोटाळे आहेत ज्याची चौकशी अजून बाकी आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये करोनाच्या संकटाचा सामना करुन त्यावर काम करणं, लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देणं, ही लढाई यशस्वीपणे लढणं जास्त महत्वाचं आहे. महाराष्ट्रातील नागरिक आणि महाराष्ट्र आम्हाला महत्वाचा वाटत असल्याने महाविकास आघाडीचं प्राधान्य करोनाविरोधातील कामांना आहे. त्यामुळे आम्ही या इतर गोष्टींकडे लक्ष देत नाही,” असं चाकणकर यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.

“आपण ज्या पद्धतीने भुजबळ यांच्यावर टीका केली, ज्या मग्रुरीमध्ये आपण बोलता ज्या पद्धतीने आपण त्यांना सांगताय की तुम्ही जामीनावर आहात. तर थोडसं मागं वळून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल तुमचे अनेक नेते जामीनावर आहेत. जामीनावरच बोलायचं झालं तर आपल्याशिवाय इतर सर्वांची बोलती बंद होईल कारण तुमचे सर्वच नेते जामीनावर बाहेर आहेत,” असा टोला व्हिडीओच्या शेवटी चाकणकर यांनी लगावला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *