“कोरोनाग्रस्त पेशंटच्या बेडवरती रेमडेसिवीर इंजेक्शन देणार होतात,कुठे आहेत? “पालकमंत्री साहेब पुणेकरांना वाचवा”- पुण्यात लागले फ्लेक्स


पुणे- पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाने कहर केला आहे. एकीकडे बेडची कमतरता असल्याने ससून रुग्णालयात एका बेडवर दोन ते तीन रुग्ण उपचार घेत आहेत, तर काहींना बेड न मिळाल्याने त्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ज्यांना बेड मिळाले त्यांना ऑक्सीजन नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन नाही, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईक वणवण भटकत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु आहे. अशी परिस्थिती असताना राजकारणी मात्र एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करत एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. मात्र, राजकारण्यांच्या या राजकारणाचा जनतेला वीट आला आहे.

आता पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीसह अनेक ठिकाणी फ्लेक्स लाऊन जाब विचारण्यात आला आहे. एका फ्लेक्सवर “मरणं झालं स्वस्त, स्मशानभूमीत लागल्या रांगा, पालकमंत्री साहेब पुणेकरांना वाचवा- कोरोनाग्रस्त पुणेकर”, असं लिहिलं आहे. तर दुसऱ्या फ्लेक्सवर “कोरोनाग्रस्त पेशंटच्या बेडवरती रेमडेसिवीर इंजेक्शन देणार होतात, कुठे आहेत? “पालकमंत्री साहेब पुणेकरांना वाचवा” – कोरोनागरस्त पुणेकर, असे लिहिले आहे.

अधिक वाचा  बेकायदेशीररित्या किडनी प्रत्यारोपण केल्याप्रकरणी रुबी हॉल क्लिनकचे प्रमुख परवेज ग्रँट यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल

गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने आणि काळा बाजार सुरू असल्याने रुग्णांचे नातेवाईक वैतागून हतबल झाले आहेत. अजूनही  रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांना या फ्लेक्सद्वारे प्रश्न करण्यात आले आहेत. फ्लेक्सवर कुणाचेही नाव नाही. त्यामुळे हे फ्लेक्स कोणी लावले हे समजू शकले नाही.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love