पुणे- भाजप सरकारच्या पाच वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली याची आकडेवारी भाजपकडे असेल. कर्जमाफी योजनाही तीन वर्ष चालली हे प्रथमच महाराष्ट्रातील जनतेला आणि शेतकरीवर्गाला दिसले त्यामुळे फडणवीसांनी महाविकास आघाडीला दोष देण्यापेक्षा स्वत: आकडे वाचावेत आणि आत्मचिंतन करावे अशी टीका क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी केली.
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सुनिल केदार यांनी भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडी शेतकरीविरोधी असून कृषी विधेयकाबाबत सरकारची दुट्टपी भुमिका असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता.
केदार पुढे म्हणाले, केंद्राने कृषी विधेयकाविषयी विरोधी पक्षांसोबत चर्चासत्र घेतले पाहिजे. शेतकऱ्यांना त्यांचा माल विकण्यासाठी बाजार समिती असलीच पाहिजे. जर या समितीत उणिवा असतील तर केंद्राने यामध्ये सुधारणा नक्की कराव्यात. याकरिता नवे कायदे लागू केले तरी हरकत नाही. परंतू माल विकण्यासाठी दालनेच बंद करायचे हे कितपत योग्य आहे. प्रत्येक बाजार समितीत केंद्र सरकारने आधारभूत किंमत ठरविण्यासाठी एक दालन सुरू करावे. शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यासोबत माल विकण्याची मुभा असावी. यासाठी सरकारने खाजगी व्यापारासोबतही स्पर्धा देखील केली पाहिजे, असेही केदार यांनी सांगितले.
महाविकास आघाडीत घरवापसी सुरू झाली आहे, याविषयी बोलताना केदार म्हणाले, कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने पक्ष मोठा होत नसतो. कुणी कमजोर असला म्हणून मी ताकदवान झालो, असे मी मानत नाही. मी स्वत:च मोठा होणार आहे, असा विचार केला पाहिजे. त्यामुळे पक्षांतराकडे मी जास्त लक्ष देत नाही, असे केदार यांनी सांगितले.