नॅनो कर्क्यूमिनच्या वापरातून मुखाच्या कर्करोगावरील परिणामकारक उपचार शक्य


पुणे- कोणत्याही प्रकारच्या कर्करोगावरील उपचार हे त्रासदायक तर असतातच शिवाय खर्चिक देखील असतात. त्यामुळे जगभरातच हे उपचार कमी त्रासदायक व परवडणा-या दरात उपलब्ध व्हावेत या दृष्टीने गेली अनेक वर्षे संशोधन सुरु आहे. लंडनमधील केंब्रिज विद्यापीठातून पीएचडी केलेले, अमरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठात प्रशिक्षित आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले बायो-नॅनो शास्त्रज्ञ डॉ. विजय कनुरु यांनी नॅनो कर्क्यूमिनच्या वापरातून मुखाच्या कर्करोगावर उपयुक्त असे नॅनो मेडिसिन विकसित केले आहे. यांच्या या संशोधनाद्वारे मुखाच्या कर्करोगाशी सामना करणा-या रुग्णांना एक आशेचा किरण गवसला आहे.

 पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत या नॅनो मेडिसिनचे विकसक डॉ. कनुरू यांनी ही माहिती दिली. कर्करोगतज्ज्ञ (ऑन्कोलॉजिस्ट) डॉ. श्रीराम इनामदार हे देखील या वेळी उपस्थित होते.     

डॉ. कनुरु यांच्या नॅनो मेडिसिनची परिणामकारकता क्लिनिकल ट्रायल्सच्या माध्यमातून सिद्ध झाली असून आशियातील ओरल पॅथॉलॉजीची सर्वात मोठी संघटना असलेल्या इंडियन असोसिएशन ऑफ ओरलच्या ‘जरनल ऑफ ओरल अँड मॅक्सीलोफेशियल पॅथोलॉजी’ अर्थात (जेओएमएफपी) या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये त्याला प्रसिद्धी देखील मिळाली आहे.

अधिक वाचा  कोरोनाशी दोन हात करणारी समर्थ भारत अभियानची ‘वॉर रूम’

या संशोधनामुळे प्राथमिक अवस्थेतील (अर्ली स्टेज) तोंडाच्या कर्करोगावर स्टिरॉइड्स न वापरता उपचार करणे शक्य होते. याबरोबरच घातक अशी केमो थेरपी व वेदनादायक रेडिएशन थेरपीवरील रुग्णाचे अवलंबित्व कमी होऊन मुखाच्या कर्करोगाची पुनरावृत्ती प्रतिबंधित करणे देखील या उपचारपद्धतीने साध्य होते.

आपल्या संशोधनाविषयी अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले, “मुखाच्या कर्करोगाला भारतातील सार्वजनिक आरोग्यासमोरील सर्वांत मोठे आव्हान समजले जाते, जागतिक आरोग्य संघटनेनेही याला दुजोरा दिला आहे. आज देशात तोंडाच्या कर्करोगामुळे प्रत्येक तासाला ५ पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू होत असताना रुग्णांना कमी त्रासदायक व परवडणा-या दरातील उपचारपद्धती विकसित करण्याचा माझा मानस होता. त्याद्वारे ‘ऑन्कोकर इंडिया’च्या वतीने नॅनो कर्क्यूमिनच्या वापरातून आम्ही ‘ब्रेकॅन’ हे नॅनो मेडिसिन विकसित केले असून याचा फायदा प्राथमिक अवस्थेतील (अर्ली स्टेज) मुखाच्या कर्करोगाचा सामना करणा-या रूग्णांसोबतच मुखाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना देखील होणार आहे.”   

मुखाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना तोंड उघडण्यावर बंधने येतात यामुळे तोंडाची स्वच्छता ठेवणे जिकीरीचे होऊन बसते. यावेळी तोंडात लाली येणे, चट्टे पडणे आदी समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो. यावेळी या समस्यांवर उपाय म्हणून रुग्णांना होणाऱ्या वेदना कमी करीत इतर औषधांपेक्षा प्रभावीपणे हे नॅनो मेडिसिन काम करते. हे होत असताना सुपरऑक्साईड डिसम्युटस् (SOD) ची पातळी वाढण्यासारखी परिणामकारकता आम्हाला दिसून आली असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  जाधवर स्पोर्टस् फेस्टिवलमध्ये २५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्ती, मुखाच्या समस्या असलेले रुग्ण हे देखील आपल्याला मुखाचा कर्करोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषधाचे सेवन करू शकतात, अशी माहिती डॉ. कनुरु यांनी दिली.

यासंदर्भातील क्लिनिकल ट्रायल्सबद्दल सांगताना ते म्हणाले, “आम्ही मुखाचा कर्करोग प्राथमिक पातळीवर असलेल्या ३० रुग्णांच्या समूहावर महिनाभर औषधाच्या या ट्रायल्स घेतल्या. या दरम्यान त्यांना वेदना शमन, तोंडातील लाली व चट्टे कमी होणे याबरोबरच सुपरऑक्साइड डिसम्युटस् (SOD) ची पातळी वाढण्यास मदत झाल्याचे दिसून आले. शिवाय औषध हे कॅप्सूल प्रकारात उपलब्ध असल्याने त्यांचे दैनंदिन जीवन सुकर झाल्याचेही समोर आले.”

या आधी मुखाच्या कर्करोगासाठी कोणत्याही प्रकारचे नॅनो मेडिसिन विकसित केले गेले नसल्याने रुग्णांना आता हे वापरणे सहज शक्य आहे. शिवाय दोन महिन्यांच्या ६० कॅप्सूल्ससाठी रु. १५०० इतक्या वाजवी किंमतीत आम्ही हे औषध उपलब्ध करून देत असल्याचे हे त्यांनी सांगितले. नजीकच्या भविष्यात मुखाच्या कर्करोगावर प्राथमिक व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दैनंदिन वापराचा स्प्रे उपलब्ध करून देण्यावर आम्ही काम करीत असल्याचे डॉ. कनुरु यांनी नमूद केले.

अधिक वाचा  'स्वतंत्रते भगवती' या साहित्यिक कार्यक्रमातून उलगडले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विविध पैलू

डॉ. विजय कनुरु यांविषयी

डॉ. विजय कनुरु यांनी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठामधून नॅनोसायन्समध्ये पीएचडी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. याबरोबरच अमेरिकेतील स्टॅनफर्ड मेडिकल स्कूल  मधून कॅन्सर सर्व्हायव्हरशिप विषयाशी संबंधित प्रशिक्षणही घेतले आहे.

डॉ. विजय कनुरु हे प्रख्यात नॅनो मेडिसिन शास्त्रज्ञ असून जागतिक दर्जाचे नॅनो तंत्रज्ञान संशोधक व उद्योजक आहेत. नॅनोटेक्नॉलॉजी आणि कृत्रिम बुद्धिमत्त्ता (एआय) यांच्या सहाय्याने कर्करोगासारख्या दुर्धर रोगावर उपचारपद्धतीच्या संशोधनावर गेली काही वर्षे ते काम करीत आहेत. याबरोबरच कर्करोगाच्या संशोधनात प्रारंभिक अवस्थेतील उपचारांसाठी प्रभावी नॅनोपार्टिकल मेडिसिनचा वापर करीत कर्करोगावर प्रगत उपचार पद्धतीवर देखील त्यांचे काम सुरु आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love