पुणे- आपणाला जे शिकावेसे वाटते ते शिकायला मिळणार आहे याबाबतचा विचार हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आला आहे. असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे यांनी व्यक्त केले. १८ व्या जागतिक मराठी संमेलनातील ” सरस्वतीच्या मंदिरात ” या परिसंवादाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन. जे. पवार, माधवी आमडेकर (लंडन), दिल्लीचे डॉ. नरेश बोडखे यामध्ये सहभागी झाले होते. सचिन इटकर आणि मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्र संचालन केले.
पांडे म्हणाले की, जगामध्ये भारत हा सर्वांत युवा देश होत आहे.त्यामुळे देशाचे भविष्य उज्ज्वल आहे. येथील युवकांना जगात जाण्याची संधी मिळणार आहे. पण हे एक आव्हान असणार आहे. याचा साकल्याने विचार केला पाहिजे. सध्याच्या शिक्षणाचा कितपत उपयोग होतो आहे याचा विचार केला पाहिजे. त्यादृष्टीने नवीन शै्क्षणिक धोरणात बदल करण्यात आले आहेत. याचा अभ्यास करून धोरण ठरवावे. जी मुले शिक्षणापासून दूर आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला आहे. परदेशातील विद्यापीठे आपल्या देशात येत आहेत. त्यामुळे त्याचा फायदा होईल, असे ते म्हणाले.
कुलगुरु पवार म्हणाले, आगामी काळात असणारी गरज लक्षात घेता देशांतील मोठया प्रमाणावर असणाऱ्या युवा शक्तीला सबळ करण्याची गरज आहे. आपल्या कडे गुणवत्ता आहे, संशोधन करण्याची मानसिकता आहे त्याला अर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. याचा नवीन धोरणात विचार करण्यात आला आहे.संशोधनासाठी आवश्यक सोयी सुविधा दिल्या पाहिजेत. तसेच ऑनलाईन शिक्षण पद्धतीला प्राधान्य द्यावे. कारण त्यामुळे शिक्षणाची व्याप्ती वाढणार आहे असेही ते म्हणाले.
डॉ. जगन्नाथ पाटील म्हणाले की, आपला देश हा विश्वगुरु होता पण मध्यंतरी तो मागे आला. पण येणाऱ्या काळात आपल्याला संधी मिळाली आहे. आपल्याकडे मोठया प्रमाणावर मनुष्यबळ आहे. त्यामुळे नजीकच्या काळात देश शिक्षणं क्षेत्रात तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकेल. त्यासाठी आपली गुणवत्ता अधिक प्रमाणावर वाढविणे आवश्यक आहे. तसेच मोफत शिक्षण न देता त्यासाठी कर्जाची सुविधा दिल्या पाहिजेत असे ते म्हणाले.
आमडेकर यांनी सांगितले की, अभ्यास किवा शिक्षणात स्मरण शक्तिची खूप गरज आहे. माहिती, आत्मसात करून त्याचे रुपांतर ज्ञानात करणे आवश्यकच आहे.याबाबतची माहिती देणारे अभ्यासक्रम तयार केले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
डॉ. नरेश बोडखे म्हणाले, भाषा शिकणे अवघड नाही कारण भाषेचे महत्व आहे. यामुळें समानता येऊ शकते. तसेच कौशल्य विकास आणि तांत्रिक शिक्षण हे मातृभाषेत दिले पाहिजे. कारण, शालेय शिक्षणात भाषा शिकणे महत्वाचे आहे. याचा नवीन धोरणात विचार करावा लागणार आहे,असे ते म्हणाले.