छत्रपती शिवाजी महाराजांमुळे भारत देश हिंदू बहूल राहिला – विष्णू कोकजे


पुणे – “लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडणारे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे भारत देश हिंदू बहूल राहिला आहे, कारण अनेक देशांवर झालेल्या इस्लामिक आक्रमणामुळे ते देश मुस्लिम देश झाले आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन माजी न्यायमूर्ती व विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी केले.

ज्येष्ठ शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या “छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर…” या पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार प्रदीप रावत व लेखक मेहेंदळे होते.

 कोकजे पुढे म्हणाले की, महाराजांचा आणि मराठ्यांचा सत्य इतिहास समाजासमोर आला पाहिजे. शिवाजी महाराजांनी परिवर्तन घडवले, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अनेकजण सध्या चुकीचा इतिहास समोर आणत आहेत, त्यासाठी सत्य समोर आणले गेले पाहिजे. महाराजांच्या गनिमी काव्याचे आज परदेशातही शिक्षण दिले जाते. हाच आदर्श आपल्याला पुढे न्यायचा आहे. इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या क्रांतिकारकांचे देखील छत्रपती शिवाजी महाराज हेच प्रेरणास्थानी होते.

अधिक वाचा  प्रसिद्ध साहित्यिक व शिक्षण तज्ज्ञ डॉ. न.म. जोशी यांना अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा 2020 चा ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

यावेळी लेखक मेहेंदळे यांनी सत्य बाहेर काढून ते समोर ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी ते म्हणाले की, इतिहासाबद्दल खोटे, दिशाभूल करणारे लेखन खोडून काढले पाहिजे. त्यासाठी पुराव्यानिशी सत्य समोर आणलेच पाहिजे. सध्याच्या पाठ्यपुस्तकात देखील असत्य लेखन प्रसिद्ध केले जात आहे. त्याचे देखील खंडन केले पाहिजे. मोगलांनी हिंदू अस्मिता संपवण्यासाठी अनन्वित अत्याचार केले आहेत, त्याचे असंख्य पुरावे, आधार आहेत. ते समोर आणले तर खरा इतिहास समोर येईल.

यावेळी प्रदीप रावत यांनी देखील, अशा विकृत इतिहासाचा समाचार घेतला. केवळ व्यक्ती संपून चालणार नाही तर जुलूम करणारी विकृत प्रवृत्ती, वाईट विचारसरणी संपवली पाहिजे. शांततापूर्ण सहजीवन इस्लाममुळे शक्य झालेले नाही, अशा अहिष्णू प्रवृतीशी लढा द्यावाच लागेल.

अधिक वाचा  आता ‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबत बाजीप्रभू देशपांडेंच्या वंशजांचा आक्षेप

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर थोरात यांनी केले तर सूत्रसंचालन निलेश धायारकर यांनी केले. विक्रम बर्गे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन विवेक विचार मंच आणि श्री शिवशंभू विचार दर्शन या संस्थांनी केले होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love