पुणे- हवेली व मुळशी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या जांबली व डावजे येथील श्री क्षेत्र निलकंठेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या आदीवासी कातकरी व डोंगरी धनगर वस्तीवर नवज्योत परिवार ट्रस्ट व लायन्स क्लब ऑफ पुणे विसडम यांच्या संयुक्त विद्यमाने वंचित व आदिवासी बांधवाना जीवनावश्यक साहित्य,अन्न,फळे, खाऊ आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संजय लगाडे, सचिव शितल लगाडे, मंगेश वांजळे,लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.महेश गायकवाड, ला.सुशीला गायकवाड आदी उपस्थित होते.
अतिशय दुर्गम अशा डोंगरी भागात कातकरी व धनगर समाजाचे वास्तव्य असून त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. या वस्तीवर जाऊन त्यांना आवश्यक असणाऱ्या जीवनोपयोगी वस्तू व कपडे यांचे वाटप करून त्यांना फळे व अन्न खाऊ घातले,त्यामुळे वस्तीवरील आबालवृद्धांसह लहान मुले देखील भारावून गेली. यावेळी 25-30 कातकरी कुटुंबे व 10-12 धनगर कुटुंबातील दीडशेहून अधिक लोकांना लाभ झाला.