पुणे— पुणे विमानतळावर सिंगापूर येथून आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे.या प्रवाशाचे नमुने घेण्यात आले असून जनुकीय क्रमनिर्धारणासाठी (जिनोम सिक्वेन्सिंग) पाठवण्यात आले असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. दरम्यान, गेल्या ८ ते १० दिवसांपासून आपण विदेशातून येणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे,” चिंता करण्याची गरज नाही, अशी माहिती पुणे महापालिकेतील सहाय्यक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी दिली आहे.
चीनमध्ये करोनाने थैमान घातलं असताना संपूर्ण जगभरासह भारतातही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिंगापूरहून येथून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. या प्रवाशाचे विमानतळावरच थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले आहे. तसेच त्याची कोरोना चाचणी देखील करण्यात आली होती. त्याचा तपासणी अहवाल हा प्रवासी पॉझिटिव्ह आला आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रवाशासंबंधी माहिती देताना वावरे यांनी सांगितलं की “ती ३२ वर्षीय महिला आहे. त्यांना कोणतंही लक्षण जाणवत नाहीये. त्यांना सध्या घऱातच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे”.
करोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देताना ते म्हणाले की “एकूण २० ठिकाणी आपण लसीकरण सुरु केलं आहे. ९० टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. पण बूस्टर डोस न घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांना आम्ही या लसीकरण केंद्रात जाऊन बूस्टर डोस घेण्यासाठी आवाहन करत आहोत. तसंच गेली २ वर्ष जी काळजी आपण घेतली तेच नियम पाळावेत असं आवाहन आहे”.
कोरोनाबाबत जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कोविड टास्क फोर्स समितीची बैठक झाली असून राज्यात आणि पुणे जिल्ह्यातही खबरदारी म्हणून प्रतिबंधक उपाययोजनेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यात सध्या कोरोनाचे ५४ रुग्ण आहेत. तर रोज ११ रुग्ण बरे होत आहेत. कोविड लसीकरणावर भर देण्यात येत आहे.