पुणे(प्रतिनिधि)—निवडणूक लोकसभेची परंतु, प्रचार मात्र विधानसभा आणि मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, या भूमिकेमुळे पुणे लोकसभा मतदार संघात महायूतीमध्ये सुरू असलेली विशेषत: कॉंग्रेस आणि शिवसेना(ऊबाठा) यांच्यामधील वादाची मालिका थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेवरून काँग्रेसमध्ये नवा वाद उफाळून आला असून उद्धव ठाकरे यांच्या कोथरूड विधानसभा मतदार संघात सभा घेण्यास कॉँग्रेसनेच विरोध दर्शविला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या समोरच्या अडचणी काही कमी व्हायला तयार नाहीत.
रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारानिमित्ताने महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या सभा, रोड, शो, मेळाव्यांचे नियोजन सुरू आहे. यानिमित्ताने कॉंग्रेस भवनात गुरूवारी रात्री कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची किंवा आदित्य ठाकरे यांची सभा घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र या मागणीवरून कॉंग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा वाद झाला. सभा झालीतच तर कोथरूड विधानसभेवर देखील ठाकरे गटाकडून दावा केला जाईल. त्याचबरोबर महापालिका निवडणुकीतील जागावाटपावर याचा परिणाम होईल असे सांगत काही पदाधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळल्याचे समोर आले आहे.
दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या रविवारच्या सभेवरूनही दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. चव्हाण यांची सभा संगमवाडी, बोपोडी की मुळा रोड येथे घ्यायची यावरून हा वाद झाल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसापासून कॉंग्रसमधील हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. याचा मोठा फटका धंगेकर यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महायुतीच्या प्रचाराला वेग
एकीकडे महाविकास अंतर्गत सुंदोपसुंदी आणि कॉँग्रेस पक्षांतर्गत कुरघोड्या सुरू असताना दुसरीकडे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. मोहोळ यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी 29 एप्रिल रोजी रेस कोर्स मैदानावर मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे.
मोदींच्या सभेसाठी महायुतीकडून जोरदार तयारी केली जात आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी युतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक देखील असून मोठे शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी करण्यात येत आहे.