अबब!पुणे मनपामध्ये सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून पावणे पाच कोटीचा घोटाळा: काय म्हणाले अजित पवार?

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे– सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा गंभीर गैरप्रकार पुणे महापालिकेत घडल्याचा समोर आले आहे. या प्रकाराने पुणे महापालिकेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांसह काही वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताने हा गैरप्रकार झाल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (सोमवारी) पुणे जिल्हा नियोजनच्या आढावा बैठकीमध्ये महापालिकेच्या इतिहासात असा पहिल्यांदाच प्रकार घडतो आहे. नेमकं चाललंय काय? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणी तीन दिवसात अहवाल सादर कारण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

या बैठकीला महापौर, मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, आमदार, खासदार यांच्यासह अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

पुणे महापालिकेच्या मलनि:सारण प्रकल्प या विभागामध्ये हा घोटाळा झाला आहे. या विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता संदीप खांदवे हे ३१ ऑगस्ट २०१९ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा पदभार, कार्यकारी अभियंता सुश्मिता शिर्के यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून देण्यात आला. त्यानंतर सुमारे तीन महिन्यानंतर २७ नोव्हेंबर २०१९ रोजी, अधिकाऱ्यांनी संगनमताने खांदवे यांचीच हूबेहूब बनावट स्वाक्षरी करून ʻपाटील कन्सट्रक्शन अँड  इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडʼ या ठेकेदाराला, ४ कोटी ८८ लाख २४ हजार ५०५ रूपयांचे बिल परस्पर अदा करून टाकले.पण खांडवे यांनी ʻतीʼ सही नसल्याचे सांगितले आहे.

मलनि:सारण विभागाच्या प्रकल्प विभागाने, संबंधित ठेकेदाराला शहरात ठिकठिकाणी मलवाहिन्या टाकण्याचे ५६ कोटी ५७ लाखाचे कंत्राट २०१७ साली दिले आहे. त्यानूसार, शहरातील सुमारे ५१ किलोमीटर लांबीच्या नदीनाल्यांमध्ये ३६ ठिकाणी उघड्यावर वाहणारे मैलापाणी हे बंदिस्त नलिकांद्वारे जवळच्या मैलापाणी शुध्दीकरण केंद्रापर्यंत वाहून नेण्यात येणार आहे. या कंत्राटातील, बारावे रनिंग बिल काढताना हा मोठा घोटाळा झाला आहे.

याबाबत पवार यांनी  महापालिकेच्या इतिहासात असा पहिल्यांदाच प्रकार घडतो आहे. नेमकं चाललंय काय? असा सवाल उपस्थित करत पवार यांनी महापौर मुरलीधर मोहोळ व आयुक्तांसमोर नाराजी व्यक्त केली. तसेच याप्रकरणी तातडीने समिती नेमून ३ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहे. त्यानुसार विक्रम कुमार यांनी त्याच ठिकाणी अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश जगताप यांच्या नेतृत्वाखालची समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *