12th exam from 21st February and 10th from 1st March

उद्यापासून (दि. 2 मार्च) दहावीची परीक्षा सुरू : यंदा विद्यार्थी संख्या घटली

महाराष्ट्र शिक्षण
Spread the love

पुणे–राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून (गुरुवार दि. २ मार्च) सुरुवात होत आहे. सर्व विभागीय मंडळातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीसंख्येत यंदा मोठी घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ६१ हजार ७०८ विद्यार्थीसंख्या कमी आहे. यंदा राज्यभरातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. सीबीएसई, आयसीएसई माध्यमाच्या शाळांकडे असणारा विद्यार्थ्यांचा कल आणि पालकांकडून एकच अपत्याचा घेतला जाणारा निर्णय यामुळे विद्यार्थीसंख्या घटल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. यावेळी मंडळाच्या सचिव डॉ. अनुराधा ओक उपस्थित होत्या.

राज्य मंडळाच्या सर्व नऊ विभागीय मंडळाच्या वतीने २ ते २५ मार्च या कालावधीत लेखी परीक्षा होत आहे. यंदा १५  लाख ७७ हजार २५६  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये ८ लाख ४४ हजार ११६ विद्यार्थी आणि ७  लाख ३३ हजार ६७ विद्यार्थिनींनी नोंदणी केली आहे. तसेच ८ हजार १८९  दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर ७३ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एकूण २३ हजार १० माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ५ हजार ३३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

गोसावी म्हणाले, कोरोना महामारी सोबतच सीबीएसई, आयसीएसई या माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी, पालकांचा ओढा वाढत आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या कमी झाली. तसेच लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने पालक एकाच अपत्यासाठी जागरूक झाले असल्याने विद्यार्थीसंख्या घटल्याचे मत गोसावी यांनी मांडले. बारावीप्रमाणे दहावीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित असणे बंधनकारक असेल. त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर देण्याची प्रथा बंद झाली आहे. परीक्षेची निर्धारित वेळ संपल्यानंतर दहा मिनिटांचा जादा अवधी विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. यंदा राज्य शासनाकडून बोर्डाच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *