शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण करणे हीच बाबासाहेबांना श्रद्धांजली


पुणे-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवसृष्टीचे स्वप्न पाहिले होते. ते पूर्ण करणे, हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आज येथे आदरांजली वाहण्यात आली.

महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि पुण्याच्या महापौरांच्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली वाहण्यासाठी आदरांजली सभा आयोजिण्यात आली होती. गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या समारंभात पुण्यातील सव्वाशे संस्थांच्या वतीने बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. राज्याचे नगर विकासमंत्री  एकनाथ शिंदे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राजमाता कल्पनाराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे, राष्ट्रीय स्वयंसेक संघाचे प्रांत संघचालक सुरेश जाधव, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, एअर मार्शल (निवृत्त) भुषण गोखले, रिअर अँडमिरल (निवृत्त) जयंत नाडकर्णी, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा  बीएसजीच्या सहकार्यातून पुण्यातील एचडीएफसी शाळेत उभारणार एसडीजी क्लब

छत्रपती शिवाजी महाराजांचे यथोचित स्मारक राज्यात होणे अगत्याचे आहे, असे बाबासाहेब मानत असते. त्यातूनच त्यानी शिवसृष्टीचे स्वप्न पाहून त्याच्या उभारणीचा ध्यास घेतला होता. त्यांच्या हयातीत शिवसृष्टीची उभारणी सुरू झाली असली, तरी ती अद्याप पूर्ण झालेली नाही. हा प्रकल्प पूर्णत्वास जाणे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल. राज्य व केंद्र शासन त्यासाठी साह्य करेलच. तथापि, समाजाने यासाठी पुढाकार घेणे अगत्याचे आहे. समाजाच्या पुढाकारातून शिवसृष्टी प्रकल्प पूर्णत्वास जावा, असे फडणवीस यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेबांबरोबरच्या  आठवणींना उजाळा दिला. तसेच, शिवसृष्टीला राज्य शासनातर्फे व व्यक्तिगतरित्या सहकार्याचे आश्वासनही दिले. बाबासाहेबांचे आमच्या घराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. ते जेव्हा साताऱ्यात येत असेत, तेव्हा ते आमच्याशी संवाद साधत. त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकणे, हा विलक्षण अनुभव होता, अशा शब्दांत राजमाता कल्पनाराजे यांनी बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. नाना जाधव यांनी संघस्वयंसेवक बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा शोकसंदेशही वाचून दाखवला.

अधिक वाचा  राजेंद्र जगताप व अरुण पवार यांच्यावतीने अजित पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा :पिंपळे गुरवमध्ये वृक्षारोपण, अंध अपंगांना धान्य वाटप

ज्येष्ठ शास्त्रज्ञ व 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे, लेखक विजयराव देशमुख यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. मी कामानिमित्त इंग्लंडमध्ये वास्तव्यास होतो. त्यावेळी मायदेशी परतल्यानंतर काही वेळा बाबासाहेबांशी बोलण्याची संधी मिळाली. त्यांच्यासमवेत मी शनिवारवाडा पाहिला. ऐतिहासिक वास्तूही ते किती जिवंत करत, हे तेव्हा मी अनुभवले. छत्रपती शिवरायांचा इतिहास त्यांनी असाच जिवंत केला,अशा शब्दांत डॉ. नारळीकर यांनी आदरांजली वाहिली.

पोवाडे आणि बखर या दोन साहित्य प्रकारांचा अनोखा संगम साधत बाबासाहेबांनी शिवचरित्र सांगितले. त्यामुळेच बाबासाहेब शिवशाहीर म्हणून ओळखले गेले आणि त्यांनी सांगितलेले शिवचरित्र लाखो लोकांच्या मनात रुजले, असे डॉ. मोरे यांनी सांगितले.

अधिक वाचा  भा. रा. तांबे यांच्या कवितांमध्ये कलावादी दृष्टी होती- प्रा. नीलिमा गुंडी

बाबासाहेबांचे शिवसृष्टीचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा संकल्प प्रत्येक पुणेकराने करावा, असे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले.

शिवसृष्टीची कल्पना देणारे दृकश्राव्य सादरीकरण व बाबासाहेबांचा जीवनपट उलगडून दाखवणारा माहितीपट यावेळी दाखवण्यात आला. निलेश धायरकर यांच्या शिववंदनेने सभेची सांगता झाली. ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love