पुणे – पायाभूत सुविधांची निर्मिती ही काळाची गरज आहे. आंगणवाडीसारख्या उपक्रमांमुळे लहान मुलांच्या निगडित सुविधांमध्ये केवळ सुधारणा होणार नाही तर प्रत्यक्षात देशाचा विकास होण्यासाठी सक्षम बनविण्यात मदत होत आहे. बारामतीतील माळेगाव येथे आंगणवाडीचा उपक्रम सोनालिका सीएसआरने हाती घेतला याचा मला आनंद आहे. या गावांच्या परिसरामध्ये अनेक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी या आंगणवाडीची मदत होईल अशी अपेक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
सोनालिका ट्रॅक्टर्स कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या उपक्रमातून (सीएसआर) पुणे जिल्ह्यातील बारामती येथील माळेगावमध्ये आंगणवाडी बांधली आहे. कुपोषणाच्या विषयामध्ये लहान मुलांसाठी काम करून माळेगाव परिसरामध्ये मूलभूत बालक-केंद्रित सेवा सुविधा या उपक्रमाद्वारे देण्यात येणार आहेत, त्याच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते.
याप्रसंगी बोलताना सोनालिका सीएसआरच्या संचालिका सुरभी मित्तल म्हणाल्या, “समाजाच्या शाश्वत भवितव्याची निर्मिती करण्याची जाणीव सोनालिका सीएसआरला आहे. हाच विचार करून भारताच्या ग्रामीण भागांमध्ये लहान मुलांच्या दृष्टीने सुविधा निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये माळेगाव येथे आंगणवाडी बांधण्यात आली असून ती एक सुरवात आहे. लहान मुलांना त्यांच्या जन्मसिद्ध हक्कांपासून ते प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी या उपक्रमाद्वारे प्रयत्न केले जातील. लहान मुलांचे पोषण, पूर्व-प्राथमिक शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी, आहार, सुशृषा या दृष्टीने सुविधा निर्मितीसाठी माळेगाव हे एक माॅडेल म्हणून काम करेल. वेळात वेळ काढून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आंगणवाडीचे उद्घाटन केले याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत व त्यांच्यामुळे आमच्या टीमचे मनोधैर्य उंचावले आहे.”