सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे दिले जाणारे ‘सुर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार’ व ‘सुर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर


पुणे : सुर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे दिले जाणारे ‘सुर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार’ व ‘सुर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर करण्यात आले. विविध क्षेत्रातील दिग्गज आणि आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केला जाणार आहे.


२३व्या स्थापनादिनाचे औचित्य साधून येत्या रविवारी (दि. ७) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या पुणे कॅम्पसमधील सुर्यभवन येथे हा पुरस्कार सोहळा होणार आहे. नालंदा विद्यापीठाचे कुलपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक अध्यक्ष आचार्य डॉ. लोकेश मुनिजी, भजनसम्राट अनूप जलोटा, ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद यांच्या उपस्थितीत पुरस्कारार्थीना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया आणि उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांनी दिली.


यंदाचा ‘सुर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार’ स्वर्गीय डॉ. टी. बी. सोलाबक्कणवार (कला आणि संस्कृती), ज्येष्ठ चरित्र अभिनेते किरण कुमार (भारतीय सिनेमा), अभया श्रीश्रीमल जैन (जागतिक उद्योजकता), डॉ. मुकुंद गुर्जर (विज्ञान आणि तंत्रज्ञान), विक्रम राजदान (दिग्दर्शक आणि निर्माता), डॉ. आर. एम. अग्रवाल (वैद्यकीय समाजसेवा), कृष्ण प्रकाश (सार्वजनिक सेवा, आरोग्य आणि तंदुरुस्ती), ज्योत्स्ना चोपडा (पर्यावरण संवर्धन व नैसर्गिक फळभाज्या) यांना प्रदान करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  काँग्रेसचे गॅरंटी कार्ड साडेपाच लाख घरामध्ये पोहचणार : महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख मोहन जोशी यांची माहिती


‘सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ पंडित विजय घाटे (भारतीय शास्त्रीय संगीत), डॉ. अद्याशा दास (पर्यटन आणि भारतीय हेरिटेज), अजिंक्य देव (भारतीय सिनेमा), साजन शाह (प्रेरक वक्ता), लावण्या राजा (जागतिक उद्योजकता), रिया जैन (ललित कला- चित्रकला), राधिका ए जे (सर्जनशील कला) यांना प्रदान करण्यात येईल.


प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “देशाच्या प्रगतीसाठी, समाजोन्नतीसाठी निःस्वार्थ कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सुर्यदत्ता ग्रुपतर्फे नेहमीच गौरव करण्यात येतो. शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वैद्यकीय आणि सामाजिक सेवा, भारतीय सिनेमा, समाजसेवा, कला आणि संस्कृती, ललित कला इत्यादी विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले आहेत. आतापर्यंत ३०० हून अधिक विविध क्षेत्रातील व्यक्तींना सूर्यदत्ता  राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.”

अधिक वाचा  'अथातो बिंब जिज्ञासा’ विवेकभान जागवणारा ग्रंथ - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन


“कला-संस्कृतीचे दर्शन घडवत पुतळ्याचे गाव उभारणाऱ्या डॉ. सोलाबक्कनवार यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. विविध भाषांत ५०० पेक्षा अधिक चित्रपटात चरित्र अभिनेता म्हणून भूमिका गाजवणारे किरणकुमार, औषधनिर्माण व नॅनोतंत्रज्ञानासारख्या उदयोन्मुख क्षेत्रासह सामाजिक कार्यात भरीव योगदान देणारे अभय जैन, विज्ञान-तंत्रज्ञान आणि संशोधनात महत्वपूर्ण कामगिरी करणारे डॉ. मुकुंद गुर्जर, उदयोन्मुख कलाकारांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देऊन दिग्गजांसोबत काम करण्याची संधी देणारे विक्रम राजदान, कोरोना काळात निस्वार्थ भावनेतून सातत्यपूर्ण काम करणारे डॉ. आर. एम. अगरवाल, प्रशासकीय सेवेत असूनही आयर्न मॅन, गिनीज बुक रेकॉर्ड होल्डर आणि आरोग्य, तंदुरुस्ती व प्रेरक वक्तृत्वातील युवकांचे आदर्श कृष्ण प्रकाश, घरातील कचऱ्याचा उपयोग करून टेरेसमध्ये फळबाग फुलवणाऱ्या व पर्यावरण संवर्धनासाठी प्रशिक्षण देणाऱ्या ज्योत्स्ना चोपडा यांना त्यांच्या भरीव कारकीर्दीची दखल घेऊन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.”

अधिक वाचा  ज्ञान,अनुभवाच्या जोरावर नारीशक्ती तेजोमय-सुषमा चोरडिया


“तबलावादक म्हणून जागतिक स्तरावर ओळख असलेले पंडित विजय घाटे, भारतातील देवळे, ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संशोधन व अभ्यासक डॉ. अद्याशा दास, शौर्यपूर्ण कामगिरी करणारे निवृत्त विंग कमांडर तरुणकुमार चौधरी, प्रेरणादायी प्रशिक्षण देणारे साजन शहा, स्टार्टअप सुरू करून १४ देशात व्यवसाय विस्तारणाऱ्या युवा उद्योजिका लावण्या राजा, फाईन आर्ट आणि चित्रकला क्षेत्रात कमी वयात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या रिया जैन आणि अपंगत्वावर मात करून कागदी खेळण्या बनवणाऱ्या व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या राधिका एजे यांना सुर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे,” असे डॉ. चोरडिया यांनी नमूद केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love