पुणे- स्व. पंतप्रधान अटलजींच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. २५ डिसेंबर रोजी सुशासन दिवस साजरा करण्यात येणार असून राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक जिल्हा व मंडल कार्यालयातर्फे पक्षाचे नेते – कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या सोबत किसान विकास सन्मान मेळाव्यात हा दिवस साजरा करतील, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष मा. माधव भांडारी यांनी गुरुवारी दिली.
पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक, पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख संजय मयेकर, पुणे शहर प्रवक्ता धनंजय जाधव, विकास लवटे उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस हडपसर, पुणे येथे तर प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील पुण्याजवळ भुगाव येथे शेतकऱ्यांसोबत सुशासन दिवस साजरा करणार आहेत, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष मा. माधव भांडारी यांनी गुरुवारी दिली.
माधव भांडारी म्हणाले की, दिवंगत माजी पंतप्रधान श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती २५ डिसेंबर हा दिवस ‘सुशासन दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी सुशासन दिनानिमित्त देशभरातील शेतकऱ्यांना दुपारी बारा वाजता संबोधित करणार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील सर्व जिल्हा व मंडल कार्यालयांतर्फे मोठ्या स्क्रीनवर हे भाषण दाखविण्याची व्यवस्था करण्यात येत असून पक्षाचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या सोबतीने या मार्गदर्शनाचा लाभ घेणार आहेत. यावेळी देशभरातील नऊ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत अठरा हजार कोटी रुपये देण्यात येतील. हे पैसे त्यांच्या खात्यात थेट पाठविण्यात येतील.
त्यांनी सांगितले की, मा. पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल. त्यामध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या विविध उपायांची माहिती देण्यात येईल. शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याची प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, किमान आधारभूत किंमतीत – एमएसपीमध्ये भरघोस वाढ, नीम कोटेड युरिया, सॉईल हेल्थ कार्ड, किसान रेल्वे, पंतप्रधान पीकविमा योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी भरीव काम केले आहे. या कार्यक्रमाला स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांना निमंत्रित केले आहे.
ते म्हणाले की, या उपक्रमात पुणे जिल्ह्यात दोन ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले असून त्यामध्ये मा. देवेंद्र फडणवीस व मा. चंद्रकांतदादा पाटील सहभागी होतील. केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी आसाममध्ये या उपक्रमात सहभागी होतील. केंद्रीय मंत्री मा. प्रकाश जावडेकर चेन्नई येथे सहभागी होतील. माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे जालना जिल्ह्यात भोकरदन येथे, माजी प्रदेशाध्यक्ष मा. सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारशा येथे, भाजपा राष्ट्रीय सचिव विनोद तावडे मुंबईत तर राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे पेण, रायगड येथे या उपक्रमात सहभागी होणार आहेत. राज्याच्या सर्व जिल्हा व तालुक्यांमध्ये पक्षातर्फे सर्व पदाधिकारी, खासदार व आमदारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.