लग्नात हुंडा मिळेल आणि तोपर्यंत भीक मागण्यास लावता येईल म्हणून केले 3 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण : महिलेला अटक


पुणे–ढोले पाटील रस्त्यावरील पदपथावरून एका तीन वर्षे वयाच्या चिमुकलीच्या अपहरणाचा गुन्हा पोलिसांनी सात दिवसांच्या प्रयत्नांनंतर उघडकीस आणला असून, महिला आरोपीस अटक करून मुलीची सुटका केली आहे. दरम्यान, मुलीला लग्नात हुंडा मिळतो, पण तोवर ती भीक मागून पैसे कमवून देईल, या उद्देशानेच या महिलेने मुलीचे अपहरण केले असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

उषा नामदेव चव्हाण (वय ४६, रा. श्रीगोंदा, जि. नगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गौरी विनोद गायकवाड (वय ३) असे सुटका केलेल्या चिमुकलीचे नाव आहे. याबाबत गौरीची आई मयुरी यांनी तक्रार दिली आहे. मयुरी यांना दोन अपत्ये आहेत. ढोले पाटील रस्त्यावर त्या फुगे विकतात. २३ मे रोजी फुगे विक्री करत असताना दुपारी उन्हामुळे त्या रिक्षात बसून विश्रांती घेत होत्या. त्यांची दोन्ही मुले खेळत होती. भरदुपारी दीडच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गौरीचे अपहरण केले. काही वेळाने हा प्रकार मयुरी यांच्या लक्षात आला. त्यांनी शोधाशोध केली. पण, मुलगी न सापडल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

अधिक वाचा  पुण्यातील इन्फ्रा.मार्केटचा पहिला केवळ महिलांचा आरएमसी प्लँट सुरू

वरिष्ठ निरीक्षक विनायक वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल घोडके आणि त्यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात एक महिला मुलीला ओढणीत गुंढाळून नेत असल्याचे दिसून आले. तब्बल पाच दिवस २५०  पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे व हातातील पिशवीच्या नावावरून पोलिसांनी आरोपीला पकडलं. सीसीटीव्ही तपासून या महिलेची ओळख पटल्यानंतर  पोलिसांनी खबऱ्यांकडून तिची माहिती घेतली. ती श्रीगोंदा येथील असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी श्रीगोंदा शहर गाठले आणि तिला ताब्यात घेतले.

आरोपी उषा हिचा विवाह झालेला असून, तिला दोन मुलगे आणि दोन मुली आहेत. तिच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले असून, लग्नात तिने ३० हजार रुपये हुंडा घेतला होता. त्यांच्या समाजात नवऱ्या मुलाच्या कुटुंबाकडून हुंडा दिला जातो. तिच्या एका मुलीचा विवाह झालेला आहे. या विवाहात नवऱ्या मुलाच्या वडिलांकडून तिला ३० हजार रुपये मिळाले होते. हुंडा मिळेल तसेच तिला भीक मागण्यास लावता येईल, यासाठी अपहरण केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love