पुणे– पुणे शहरातील कोरोनच्या दररोज नवीन वाढत्या रुग्ण संख्येने पुणेकरांच्या चिंता वाढल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून दररोज नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अडीच हजरांपेक्षा जास्तने वाढत आहे. शुक्रवारी पुणे शहरात तब्बल 2834 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर दिवसभरात 28 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. या 28 मृत्यू पावलेल्या रुग्णांपैकी 13 रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. आत्तापर्यंत एकूण मृतांची संख्या 5017 इतकी झाली आहे.
कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर पुणे शहरातही कोरोना आटोक्यात आल्याची चिन्हे दिसत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या पांच महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ शुक्रवारी (2834) झाली. 499 रुग्ण गंभीर आहेत. दरम्यान, आज दिवसभरात 12 हजार 625 जणांची तपासणी करण्यात आली. तर 808 रुग्णांना घरी सोडण्यात आले.
पुण्यात कोरोना बाधित सक्रिय रुग्णसंख्या 18,888 आहे. आजपर्यंत एकूण 205478 जणांना उपचारणांतर घरी सोडण्यात आले आहे.