निधी समर्पण अभियानादरम्यान ५.४५ लाख ठिकाणच्या १२.४७ कोटी कुटुंबियांशी संपर्क – डॉ. मनमोहन वैद्य

राष्ट्रीय
Spread the love

बंगळुरु : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची वार्षिक सभा दरवर्षी होत असते. या बैठकीत सर्वसाधारणपणे वर्षभराच्या कार्याचे सिंहावलोकन केले जाते व आगामी वर्षाची तयारी केली जाते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी येथे केले. यावर्षी सरकार्यवाहपदाचीही निवड करण्यात येणार असून पुढील तीन वर्षांकरिता संघकार्याच्या आगामी योजनांवर बैठकीत चर्चा होईल, असेही त्यांनी पुढे नमूद केले.

बंगळुरु येथे आज (19 मार्च) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधीच्या दोन दिवसीय सभेचे उद्घाटन झाले. यानंतर होणाऱ्या बैठकीत चर्चेसाठी येणाऱ्या विषयांसंबंधी प्रसारमाध्यमांना माहिती देताना डॉ. मनमोहन वैद्य बोलत होते.  

डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले, ‘कोरोनामुळे मार्च ते जून महिन्यापर्यंत संघाचे कार्य पूर्णत: बंद होते, शाखा बंद होत्या. जुलैपासून हळूहळू शाखा लावण्यास सुरुवात झाली. शाखा बंद होत्या, मात्र संघ स्वयंसेवक सक्रिय होते. कोरोनामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीत देशभर पहिल्या दिवसापासून सामाजिक मदतीसाठी स्वयंसेवक सक्रिय होते. अन्य प्रभावी कल्याणकारी राज्यात प्रशासकीय व्यवस्था सक्रिय असते. मात्र भारताचे हे वैशिष्ट्य आहे की, येथे सरकारी, प्रशासनाच्या सेवांसोबतच समाजाचाही सहभाग होता. पूर, भूकंप अशा आपत्कालीन काळात सेवा करणे वेगळे, मात्र कोरोनाकाळात संक्रमणाची भीती असतानाही स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सेवाकार्य केले.   

डॉ. मनमोहन म्हणाले, ‘कोरोना काळात स्वयंसेवकांनी देशभरात सेवाभारतीच्या माध्यमातून ९२ हजार ६५६ ठिकाणी सेवाकार्य केले. याकरिता ५ लाख ६० हजार कार्यकर्ते सक्रिय होते. या कार्यादरम्यान ७३ लाख जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, साडेचार कोटी लोकांना भोजन पॅकेटचे वितरण करण्यात आले. तसेच ९० लाख मास्कचे वितरण, २० लाख प्रवासींना मदत करण्यात आली. २ लाख ५० हजार भटके-विमुक्त समाजातील लोकांना मदत करण्यात आली. ६० हजार युनिट रक्तदान करण्यात आले. केवळ संघच नाही तर समाजातील अनेक संघटना, मठ, मंदिरे, गुरुद्वारांनीही समाजाची सेवा केली.  

मागील मार्च महिन्याच्या तुलनेत ८९ टक्के शाखा पुन्हा सुरु करण्यात आल्या. संघाचे कार्य देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये आहे. देशात ६ हजार ४९५ खंडांपैकी (तालुके) ८५ टक्के भागात संघाचे कार्य सुरु आहे. ५८ हजार ५०० मंडलांपैकी ४० टक्के भागांत प्रत्यक्ष शाखा असून २० टक्के भागात संपर्क आहे. आगामी तीन वर्षांत सर्व मंडलांपर्यंत संघाचे कार्य पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

श्रीराम मंदिर हे केवळ मंदिर नसून, श्रीराम हे भारताच्या संस्कृतीची ओळख आहेत, चरित्र आहेत. सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेवेळी १९५१ साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी म्हटले होते – मंदिर हे आपल्या सांस्कृतिक जागरणाचे केंद्र आहे. आज येथे मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा होत आहे, ज्या दिवशी भारताचे सांस्कृतिक मूल्य आणि भारताची समृद्धी त्या उंचीपर्यंत पोहोचेल तेव्हा या मंदिरनिर्माणाचे कार्य पूर्ण होईल. त्यादृष्टीने पाहिले तर, सर्व भारतीयांना एकसूत्रतेत जोडणारे भावनात्मक शक्ती श्रीराम आहेत. देवाला मानले अथवा न मानले तरी सांस्कृतिक मूल्यांचे प्रतीक अवश्य मानले जाते.

निधी समर्पण अभियानात जास्तीत जास्त निधी एकत्र करणे हा एकमात्र उद्देश स्वयंसेवकांचा कधीच नव्हता. तर देशभरातील जास्तीत जास्त गावांपर्यंत,  कुटुंबियांपर्यंत पोहोचणे, हे त्यांचे लक्ष्य होते. यापूर्वी इतके व्यापक जनसंपर्क अभियान कधी झाले नव्हते. अभियानांतर्गत स्वयंसेवक ५ लाख ४५ हजार ७३७ ठिकाणी पोहोचले तसेच जवळपास २० लाख कार्यकर्त्यांचा संपर्क अभियानात समावेश होता. स्वयंसेवकांनी अभियानांतर्गत देशातील १२ कोटी ४७ लाख २१ हजार कुटुंबियांशी संपर्क साधला. संपूर्ण देशात भावनात्मक एकात्मतेचा अनुभव आला.

बैठकीत कोरोना काळात समाजाचा सहभाग, भारताचे जगासमोरील उदाहरण,  वॅक्सीनची निर्मिती व अभिनंदन करणारा प्रस्ताव असणार आहे. याचबरोबर श्रीराम मंदिराविषयीही प्रस्तावात चर्चा होईल. 

कोरोना काळ आणि श्रीराम मंदिर जनसंपर्क अभियानात असे लक्षात आले की, संघाबद्दल जाणून घेण्याविषयी समाजात उत्सुकता वाढली आहे. याकरिता ठिकठिकाणी ‘संघ परिचर्य वर्गा’ ची योजना असावी. अशी आमची योजना आहे. संघाशी जोडणाऱ्या लोकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. समाज परिवर्तनाच्या कार्यात संघासोबत मिळून काम करण्यास उत्सुक असणारे लोक मिळाले आहेत, त्या सगळ्यांना एकत्र घेऊन समाज परिवर्तनाच्या दिशेने अधिकाधिक काम कसे करु शकतो, याचबरोबर आगामी तीन वर्षांत संघ कार्याचा विस्तार, कार्यकर्त्यांचा विकास आदी विषयांवरदेखील चर्चा केली जाणार आहे, असेही डॉ. मनमोहनजी यावेळी म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *