पुणे(प्रतिनिधि)- ‘भटकती आत्मा’ असे पंतप्रधान मोदी कोणाला उद्देशून म्हणाले ते मला माहिती नाही. मी त्या सभेमध्ये होतो. पुढच्या सभेत मला उपस्थित राहण्याची संधी मिळेल तेव्हा मी मोदी साहेबांना विचारेल,त्यांनी भटकती आत्मा हा उल्लेख कोणाला डोळ्यासमोर ठेवून केला आहे का? हे विचारून तुम्हाला उत्तर देतो असे सांगत देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावध पवित्रा घेतला.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त अजित पवार यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
दरम्यान, भटकती आत्मा म्हणत मोदींनी केलेल्या टिकेला शरद पवारांनी उत्तर दिलं. माझा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ होतो, असं शरद पवार म्हणाले. त्याबद्दल अजित पवारांना विचारलं असता, ‘त्यांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे. आज मी वेगळा मार्ग निवडला आहे. एकेकाळी मी त्यांना दैवत मानत होतो. ते वडिलधारे आहेत. त्यांच्या विधानावर मी बोलावं तितका मी मोठा नाही,’ असा काहीसा नरमाईचा सूर अजित पवारांनी लावला.
माझे अवगुण कळायला १७ वर्षे लागली का? असा सवाल सुळेंनी अजित पवारांना विचारला होता. त्याबद्दल पत्रकारांशी प्रश्न विचारला असता, आमच्या डोक्यात प्रकाश पडायला १७ वर्षे लागली. काय म्हणणं आहे तुझं? असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी केला.
बारामतीत धनशक्तीचा वापर सुरू असल्याची टीका आमदार रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांनी केली होती. त्याबद्दल विचारलं असता अजित पवार यांनी ‘कोणी काय बोलावं ते त्यांच्याकडे. मी त्यांना उत्तर देण्यास बांधील नाही. आमच्या योग्यतेच्या माणसांनी विचारलं असेल तरच मी बोलेन,’ असं उत्तर दिले.
महाराष्ट्र लुटला जात आहे आणि लुटारुंच्या हाती महाराष्ट्र दिला जात आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर केली आहे. त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि मी एकत्र काम केलं आहे. आमच्याच त्यावेळी कोणतेही मतभेद नव्हते. आता ते लयलूट केलं म्हणून म्हणत असेल तर त्यांनी कुठे आणि कधी लयलूट झाली हे सांगावं. सोबतच निवडणुकीच्या दिवसांत अनेकजण अनेकांवर टीका करत असतात. निवडणुकीच्यावेळी कोणतीही टीका किंवा वक्तव्य गांभीर्यानं घ्यायचं नसतं, असं माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी सांगितलं होतं, हे मला आठवतं. निवडणुकीच्या काळात असे आरोप होतात.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, मी कुणाला धमकी दिली नाही. आज विरोधकांकडे कुठलाही मुद्दा राहिला नाही. आमच्या बद्दल गैरसमज पसरवला जात आहे. आम्ही त्यांच्याबरोबर असतानाही कधी धमक्या दिल्या नाही. यापुढेही धमक्या दिल्या जाणार नाहीत. त्यासोबतच ते म्हणाले की मोदी साहेबांच्या विरोधात कुठलाही मुद्दा विरोधकांना राहिला नाही. खालचे मुद्दे वर येतात. मोदी साहेबांवर भ्रष्टाचाराबद्दल कुठलाही आरोप दहा वर्षात झाला नाही. त्याबद्दल हे कोणी काही बोलत नाही. मोदींमुळे अनेकांना सत्तेपासून बाजूला राहावं लागलं आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील जनता सुज्ञ आहे.