जवाहर नगर गणेशोत्सव मंडळातर्फे भव्य रक्तदान व महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन


पुणे(प्रतिनिधी)-गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजसेवा आणि मानवतेचा संदेश देणारा उपक्रम ठरावा, या उद्देशाने जवाहर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पुणे आणि लायन्स क्लब, पुणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयाने शनिवार, दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिर व महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या आरोग्य सेवा उपक्रमाचे उद्घाटन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री शाम पवार, उत्सवप्रमुख श्रीकांत कांबळे तसेच घोलप ब्लड बँकेचे प्रतिनिधी, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला लायन्स क्लब, पुणे शहराचे अध्यक्ष श्री दीपक थोरात व घोलप ब्लड बँक चे रोहिदास घोलप यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या शिबिरामध्ये नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासण्या व मार्गदर्शन मोफत उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी तपासणी व मार्गदर्शन, बीएमआय तपासणी, रक्तदाब तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी व उपचार मार्गदर्शन यांचा समावेश होता.
यासोबतच नागरिकांमध्ये अवयवदान आणि नेत्रदानाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी नेत्रदान संकल्प नोंदणी व अवयवदान संकल्प नोंदणी उपक्रमही राबविण्यात आला.
रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान हे गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरू शकते, तसेच आरोग्य तपासणीमुळे विविध आजारांचे प्राथमिक स्तरावर निदान होण्यास मदत होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
“उत्सवातून सेवेकडे आणि सेवेतून मानवतेकडे” हा विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला. गणेशोत्सवाच्या आनंदासोबतच सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा मंडळाचा संकल्प असल्याचे संयोजक अभिषेक शेजाळे यांनी सांगितले.
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  #Supriya Sule Vs Sunetra Pawar : बारामती लोकसभेसाठी नणंद- भावजय येणार आमणे सामने?