पुणे–चीन या देशाने मागील चाळीस वर्षात चांगली प्रगती केली आहे, मात्र ही प्रगती तेथील एकधिकारशाहीतून आलेली असून ती चिनी जनतेसाठी योग्य नसल्याचे मत चीन, भुतान आणि पाकिस्तानचे माजी भारतीय राजदूत गौतम बंबावले यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, सेंटर फॉर चायना अनलिसिस अँड स्ट्रॅटेजी, सेन्टर फॉर ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीक स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने चीनचा उदय आणि जागतिक राजकारणावरील परिणाम या विषयावर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन सोमवारी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील शिवाजी सभागृहात झाले. त्यावेळी गौतम बंबावले बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, एअर मार्शल भूषण गोखले, पीटर रिमेले, डॉ. विजय खरे आदी मान्यवर उपस्थित
बंबावले म्हणाले, चीनमध्ये सतत एकाच पक्षाकडे असणारी सत्ता, या सत्तेला देशांतर्गत धोका निर्माण होऊ नये म्हणून घेतलेले आर्थिक प्रगतीला मारक निर्णय, यामुळे अर्थव्यवस्थेचा मंदावलेला वेग, सुरक्षेच्या नावाखाली होणारी दडपशाही आणि माध्यमे आणि समाजमाध्यमांवर असणारा वचक या सर्व गोष्टींचा ट्रेंड आला आहे ज्यामुळे प्रगतीचा आलेख जरी वाढत असला तरी तेथील लोकशाही धोक्यात येत आहे. भारताने चीनशी संबंध प्रस्थापित केल्याने त्यांची ६० बिलियन आर्थिक उलाढाल होते आहे, मात्र सीमावादावर चीन माघार घ्यायला तयार नसेल तर भारतानेही त्यांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणे बंद करणे आवश्यक आहे असेही ते यावेळी म्हणाले.
चीनने मागील काही वर्षात शिक्षणात मोठी प्रगती केलेली दिसत आहे. त्यांनी विज्ञान तंत्रज्ञान, स्टार्टअप वर भर दिला आहे. भरताचीही पाऊले शिक्षणाच्या दृष्टीने त्याच दिशेने जात आहेत. औद्योगिकरण आणि शिक्षणाची सांगड घालणे हा मुद्दा येथे मला खूप महत्त्वाचा वाटतो. अशा परिषदांच्या माध्यमातून आपल्या चांगल्या व वाईट गोष्टी जाणून घेत त्यावर काम करण्याची संधी मिळते, डॉ. नितीन करमळकर यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी भूषण पटवर्धन, पीटर रिमेले, विजय खरे यांनीही आपले विचार मांडले.