नवी दिल्ली- कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य असून विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्वाची आहे असे सांगत पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. आता राज्य मंत्रिमंडळाकडूनही याच पद्धतीने निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. उद्या हा निर्णय होण्याची शक्यता आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई और आईसीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. पालक संघटनांनीही तशीच मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील संभ्रम दूर करण्याची आवश्यकता आहे, सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवणे योग्य होणार नाही, सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
दरम्यान, पास करण्याचे निकष काय असतील, पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे कशाप्रकारे निकष लावायचे याबाबतचा निर्णय केंद्रीय आणि राज्य मंडळाच्या एकत्रित विचार विनीमयाने घेतला जाईल